कोटक ज्युनिअर शिष्यवृत्ती ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि उपजीविकेसाठी प्रोत्साहन देणारी शिष्यवृत्ती योजना आहे. कोटक महिंद्रा उद्योग समूहाद्वारे सामाजिक कृतज्ञता म्हणून ही शिष्यवृत्ती राबवली जाते.
SSC, CBSE आणि ICSE बोर्डांमधील इयत्ता 11वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. यात विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांन रोजगार सक्षम बनवणे, वेळोवेळी समुपदेशन करणे आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे आदी बाबी यात समाविष्ट आहेत.
Table of contents [Show]
कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF)
कोटक ज्युनिअर शिष्यवृत्ती ही ‘कोटक एज्युकेशन फाउंडेशन’ द्वारे दिली जाते. 2007 मध्ये कोटक उद्योग समुहाने या फाउंडेशनची स्थापना केली. वंचित समुहातील विद्यार्थी आणि तरुणांना शिक्षण देणे आणि रोजगारक्षम बनवणे हे या फाउंडेशनचे उद्दिष्ट्य आहे. फाउंडेशनचे शालेय शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण प्रकल्प मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि पालघरमध्ये कार्यरत आहेत. असे असले तरी कोटक ज्युनिअर शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात राहणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
कोटक एज्युकेशन फाउंडेशन विद्यार्थ्यांना अनेक उपक्रमांद्वारे मदत करते. शालेय शिक्षण, शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम पात्र विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी फाउंडेशन सहकार्य करते.
चला तर जाणून घेऊया या शिष्यवृत्तीसाठी कोण अर्ज करू शकतात आणि त्यासाठी आवश्यक पात्रता काय व इतर माहिती सविस्तरपणे…
शिष्यवृत्तीसाठी पात्रता निकष काय?
- अर्जदारांनी इयत्ता 10 बोर्डाच्या परीक्षांमध्ये (SSC, CBSE आणि ICSE) 85% पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 3,20,000/- किंवा त्यापेक्षा अधिक नसावे.
- अर्जदाराने शिक्षणासाठी मुंबई शहर आणि उपनगरातील कुठल्याही मान्यतापात्र शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
कुठली शैक्षणिक मदत मिळणार?
- इयत्ता 11 आणि 12 च्या विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते.
- शैक्षणिक प्रवासासाठी वेळोवेळी तज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाते.
- शैक्षणिक समुपदेशन देखील केले जाते.
- करिअर मार्गदर्शन केले जाते.
- 12 वी नंतर विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी शैक्षणिक साहित्यासाठी मदत केली जाते.
- विविध नामांकित शैक्षणिक संस्थांना आणि औद्योगिक कंपन्यांना भेट देण्याची संधी दिली जाते.
- विद्यार्थ्यांच्या पालकांशी नियमित संवाद साधला जातो.
कोटक ज्युनियर शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा?
स्टेप 1: कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या (KEF) अधिकृत वेबसाईटला भेट द्या. https://kotakeducation.org/kotak-junior-scholarship/ येथे ‘Apply Now’ वर क्लिक करा. आता तुमच्या स्क्रीनवर B4S पोर्टलची वेबसाईट ओपन होईल. इथे तुमचा ईमेल आयडी किंवा फोन नंबरसह स्वतःची नोंदणी करा.
स्टेप 2: ओळख पडताळणीसाठी तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. सदर OTP एंटर करा.
स्टेप 3: OTP एंटर केल्यानंतर तुमची नोंदणी अधिकृत होईल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, लॉग इन करा आणि तुमचा ईमेल आयडी किंवा फोन नंबर आणि पासवर्डसह अर्ज भरा.
स्टेप 4: अर्ज भरल्यानंतर 3 महिन्यांच्या आत कोटक एज्युकेशन फाऊंडेशनला उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 3,20,000/- किंवा त्यापेक्षा अधिक नसावे हे लक्षात असू द्या. तुम्ही https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en वरून उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवू शकता.
स्टेप 5: शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना KEF द्वारे 30 ऑगस्ट 2023 रोजी किंवा त्यापूर्वी संपर्क केला जाईल आणि पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन केले जाईल.
कोटक ज्युनिअर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे.