Badnera News : अमरावती जिल्हा हा विदर्भातील एक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. अमरावती हे राष्ट्रीय महामार्गावरील 6 नंबरचे शहर आहे, त्यामुळे त्या भागात दळणवळणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर आहेत. अमरावतीची बाजार समितीही भरपूर प्रसिद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे महापालिकेच्या जागेवर बाजार भरतो. ती बाजार भरण्याची जागा भाडे तत्वावर आहे. 1990 पासून अमरावती बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर जनावरांच्या बाजार नियमनास सुरवात झाली. 5 एकरांवर विस्तारित असलेला हा बाजार आता दर शुक्रवारी भरतो.
Table of contents [Show]
बडनेऱ्यातील आठवडी बाजाराचे वैशिष्टे
देशी गाय, बैल, म्हशी, मेंढी, शेळयांची खरेदी विक्री येथे केली जाते. मुर्हा, जाफराबादी म्हशींची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा अधिक, बैलांची 80 हजार रुपयांपेक्षा जास्त, तर शेळीची किंमत सरासरी अडीच हजार रुपयांपासून पुढे राहते. बडनेऱ्यातील या बाजाराचे वैशिष्टे म्हणजे येथे उत्तर प्रदेशातील आप्रा येथून म्हशी तसेच गुजराती दुधाळ म्हशीही येतात. अशाप्रकारे जातिवंत दुधाळ म्हशींची विविधता देणारा हा विदर्भातील एकमेव बाजार असावा.
बाजार समितीकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा
बाजार समितीने विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कार्यालय, लिलाव भवन, शेड्स तसेच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. पूर्वी बाजार समितीच्या आवारात अतिक्रमणाची घटना घडल्याने तेथे संरक्षक कुंपण घातले आहे. पशुवैद्यकाची सेवाही तेथे उपलब्ध आहे.
गावरान बैलांची किंमत लाखाच्या घरात
अधिक उंच, राकट हरियाना बैलांचीही आवक होते. संत्राबागायतदार प्रामुख्याने त्याची खरेदी करतात. 70 हजारांपासून पासून ते 1.5 लाख रुपयांची त्यांची जोडी मिळते. हे बैल काटक राहतात. परिणामी बागेत चिखल असताना ते गावरान बैलांच्या तुलनेत प्रभावी काम करतात अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
या आठवडी बाजाराचे वार्षिक उत्पन्न किती?
बाजार समिती कडून 1 रुपया 5 पैसे प्रति शेकडा सेस आकारला जातो. या माध्यमातून 2022 - 23 मध्ये 18 लाख 86 हजार 484 रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला झाले. बाजारात जनावर दाखल झाल्यानंतर मोठ्या जनावरांसाठी प्रति 5 रुपये तर शेळीसाठी 3 रुपये प्रवेश शुल्क आहे.
बडनेरा बाजारात जनावरांची आवक आणि विक्री
प्राणी | आवक | विक्री |
शेळी | 1649 | 1052 |
गाय | 879 | 419 |
बैल | 1352 | 959 |
म्हैस | 9106 | 6373 |
वळू | 309 | 193 |
रेडा | 1105 | 712 |