Amul Doodle On Launch Mumbai Apple Store : टेक जायंट कंपनी ॲपल चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टिम कूक यांनी मुंबई आणि दिल्ली येथील दोन्ही ॲपल स्टोअर्सचे उद्घाटन करण्यासाठी भारताला भेट दिली. दरम्यान त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित सोबत खाललेला वडापाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुकेश अंबानी यांच्या कुटूंबियांसह अनेकांची भेट घेतली. तसेच टिम कूक यांना बघण्यासाठी दोन्ही ॲपल स्टोअर्सच्या उद्घाटनावेळी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. एकंदरच गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्वत्र टिम कूक यांचाच गजावाजा होता. टिम कूक यांनी देखील भारत भेटी दरम्यानचे अनेक प्रसंग आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन शेअर केले.
ट्विटरवर डूडलच्या कौतुकांचा वर्षाव
ॲपल ने मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे पहिले रिटेल स्टोअर उघडले. ॲपल चे सीईओ टिम कुक यांनी हे स्टोअर लॉन्च केले. या बातमीने अख्ख्या जगाचे लक्ष वेधले होते. प्रिंटसह सर्व इलेक्ट्रॉनिक मिडीयावर दिवसभर याच गोष्टींची चर्चा सुरु होती. यातच भर म्हणून डेअरी ब्रँड अमूलने देखील डूडल बनवून टिम कूक यांना शुभेच्छा दिल्या. सोबतच 'कूक विथ इट!' अशी टॅग लाईन दिली. महत्वाची बाब म्हणजे अमूलने तयार केलेल्या या डूडलची प्रचंड चर्चा आहे आणि ट्विटरवर या डूडलचे अनेकांनी कौतुक केले.
कूकचे असेही चाहते
कूकच्या भारत भेटीदरम्यान ॲपल च्या दोन चाहत्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यापैकी एका चाहत्याने कूक बरोबर ॲपल मॅकिंटॉश घेतला आणि दुसऱ्या चाहत्याने मुंबई ॲपल स्टोअर लॉन्चिंगच्या एक दिवसाआधीपासून कूक यांची वाट बघत, स्टोअर लाँच होताच ॲपल आयपॉड विकत घेतला, आणि कूकची स्वाक्षरी त्यावर घेतली.
क्रिएटीव्हीटीकरीता प्रसिध्द अमूलचे डूडल
अमूल दूध कंपनीचे डूडल हे नेहमीच त्याच्या क्रिएटीव्हीटी करीता ओळखले जाते. ताज्या बातम्या, तंत्रज्ञान क्षेत्रातील झेप, क्रिडा क्षेत्रातील जल्लोत्सव, इतर अनेक गोष्टी अमूलच्या डूडलवर नेहमी आकर्षकपणे आणि वाचकांचे मन प्रसन्न होईल, अश्या पध्दतीने दिल्या जातात.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            