गो एअर दिवाळखोरीत निघाल्यानंतर भारतातील विमान कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारची मालकी असणाऱ्या अलायन्स एअरवर संकट वाढले आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून अलायन्स एअरला तातडीने 300 कोटींची मदत केली जाणार आहे.
एअर इंडियाची टाटा ग्रुपला विक्री केल्यानंतर केंद्र सरकारकडे अलायन्स एअर ही विमान कंपनी आहे. मात्र ही कंपनी देखील प्रचंड तोट्यात आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अलायन्स एअरला 447.76 कोटींचा तोटा झाला होता. मागील काही महिन्यांपासून अलायन्स एअरला आर्थिक चणचण सोसावी लागत आहे. वेतन मिळत नसल्याने अलायन्स एअरच्या वैमानिकांनी नुकताच संप देखील केला होता. त्यामुळे कंपनीच्या सेवेवर परिणाम झाला होता.
केंद्र सरकारची मालकी असलेल्या एआय असेट होल्डिंग लिमिटेडकडे (AIAHL) अलायन्स एअर आहे. अलायन्स एअरकडून दररोज 130 विमान सेवा चालवल्या जातात. मात्र यातून कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. कंपनीची आर्थिक गरज भागवण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने अलायन्स एअरला 300 कोटी देण्याची घोषणा केली. अलायन्सचे भाग भांडवल 2000 कोटींचे आहे.
एआय असेट होल्डिंग लिमिटेडअंतर्गत चार कंपन्यांचा समावेश आहे. यात एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, एअरलाईन अलाईड सर्व्हिसेस आणि हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या चार कंपन्या आहे. एअर इंडियाचे खासगीकरण करताना या चारही कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा विचार केंद्र सरकारने केला होता. मात्र त्यावेळी हा प्रस्ताव बारगळा. एअर इंडियासाठी सरकारला अनेकदा निविदा काढावी लागली होती. त्यानंतर टाटा समूहाने एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांची खरेदी केली.
वाडिया ग्रुपच्या 'गो फर्स्ट एअर'या विमान कंपनीने सादर केलेली दिवाळखोरीची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने दाखल करुन घेतली आहे. लवादाने अभिलाष लाल यांची इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. 'गो फर्स्ट एअर'वर 6521 कोटींचे कर्ज आहे. आर्थिक चणचण असल्याने कंपनीने 19 मे 2023 पर्यंत विमान सेवा खंडीत केली आहे.
तब्बल 17 वर्ष सेवा दिल्यानंतर 'गो फर्स्ट एअर' आर्थिक संकटात सापडली. 'गो फर्स्ट एअर'ने 2 मे 2023 रोजी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर हवाई क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. 'गो फर्स्ट एअर'ने अचानक सर्वच सेवा रद्द केल्याने हजारो प्रवाशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कंपनीना प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत करण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक महासंचनालयाने दिले आहेत. जवळपास 350 कोटींची तजवजी कंपनीला करावी लागणार आहे.