Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ajay Banga : जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बंगा यांची निवड; 2 जूनपासून कार्यभार सांभाळणार

World Bank President of Ajay Banga

Ajay Banga: जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदावर भारतीय वंशाची व्यक्ती पदभार सांभाळण्याची ही पहिलीच वेळ आहे. येत्या 2 जून 2023पासून ते कार्यभार स्वीकारतील.

जागतिक बँकेच्या (World Bank) अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा (Ajay Banga) याची निवड करण्यात आली आहे. ही निवड बँकेच्या 25 कार्यकारी सदस्यीय मंडळाने केली असून यापुढे 5 वर्षासाठी अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. बुधवारी (3 मे 2023) यासंदर्भात जागतिक बँकेने अधिकृत घोषणा केली. येत्या 2 जून 2023 पासून ते या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

साधारण फेब्रुवारी महिन्यात जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास (David Malpass) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर जो बायडन (Joe Biden) यांनी मास्टरकार्ड इंकचे माजी सीईओ अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली होती. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदी भारतीय वंशाची व्यक्ती पदभार सांभाळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जो बायडन यांचा अजय बंगांच्या नावाला पाठिंबा

फेब्रुवारी 2023 दरम्यान विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास (David Malpass) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मार्च 2023 मध्ये जागतिक बँकेकडून अध्यक्ष पदाच्या नावाची शिफारस मागवण्यात आली. या शिफारसीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मास्टरकार्ड इंकचे माजी सीईओ अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली होती.

यासोबतच समर्थनासाठी देण्यात आलेल्या पत्रात, 55 वकील, अनेक दिग्गज आणि माजी सरकारी अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी देखील बंगा यांना पाठिंबा दिला. याशिवाय नोबेल विजेते डॉ. जोसेफ स्टिग्लिट्झ (Dr. Joseph Stiglitz), डॉ. मायकेल स्पेन्स (Dr. Michael Spence), आणि प्रा. मुहम्मद युनूस (Prof. Muhammad Yunus) यांनी देखील बंगा यांना पाठींबा दर्शवला.

अजय बंगा कोण आहेत?

अमेरिकन नागरिक असलेले अजय बंगा मूळचे भारतीय वंशाचे आहेत. त्यांचा महाराष्ट्रातील पुण्यात खडकी येथे 10 नोव्हेंबर 1959 साली जन्म झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पंजाबमधील जालंधरचे. त्यांचे वडील हरभजन सिंग बंगा (Harbhajan Singh Banga) यांनी भारतीय लष्करात सेवा बजावली असून ते लेफ्टनंट जनरल म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

बंगांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथे पूर्ण झाले. त्यानंतर सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून (St. Stephen's College, University of Delhi) त्यांनी अर्थशास्त्र विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स (Bachelor of Arts) ही पदवी संपादन केली. तसेच त्यांनी आयआयएम (IIM) अहमदाबादमध्ये व्यवस्थापन (Managment) विषयात पीजीपी (Equivalent to MBA) पदवी प्राप्त केली.

अजय बंगा सध्या खासगी इक्विटी फर्म जनरल अटलांटिकचे (General Atlantic) उपाध्यक्ष आहेत. त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त व्यावसायिक कामाचा तगडा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी मास्टरकार्ड, अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स अँड डाऊ इंकच्या बोर्डमध्ये विविध भूमिका बजावल्या आहेत. याशिवाय सिटी ग्रुप, पेप्सिको आणि नेस्ले या मोठ्या उद्योग समुहामध्येही त्यांनी काम केले आहे.

गेली 12 वर्ष ते मास्टरकार्डचे सीईओ (CEO of Mastercard) म्हणून काम पाहत होते. डिसेंबर 2021 मध्ये ते मास्टरकार्डमधून त्यांनी निवृत्ती घेतली. बंगांनी यांच्या कार्यकाळात अनेक कंपन्यांना डिजिटल अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी मदत केली.

यूएस सरकारसोबत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव

महत्त्वाचं म्हणजे अजय बंगा यांना यूएस सरकारसोबत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. फेब्रुवारी 2015मध्ये, त्यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (President Barack Obama) यांनी व्यापार धोरण आणि वाटाघाटींसाठी अध्यक्षांच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्त केले होते. तसेच भारतात वाढलेल्या बंगा यांना विकसनशील देशांसमोरील आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभव आहे.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

स्वतःच्या कामामुळे चर्चेत असलेल्या बंगा यांना मायदेशी देखील सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने 2016 मध्ये त्यांना चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री (Padma Shri) दिला आहे. भारत आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी बंगा हे महत्त्वपूर्ण योगदान देतील असे अनेकांचे मत आहे. 

Source: hindi.moneycontrol.com