ICC मेन्स वर्ल्ड कप 2023 ऑक्टोबर महिन्यात सुरू होत आहे. मात्र, त्याआधीच क्रिकेटचा फिवर भारतीयांवर सवार झाल्याचं दिसून येत आहे. यंदा वर्ल्ड कप सामन्यांचे यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे भारतातील विविध शहरांमध्ये हे सामने होतील. यातील भारत-पाकिस्तान सामन्यांची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धींचा सामना रंगणार आहे. मात्र, त्यासाठी अहमदाबाद विमानाचे तिकीट 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे.
क्रिकेट सामने सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी आहेत. मागील काही दिवसांपासून क्रिकेटच्या महत्त्वाच्या सामन्यांसाठी हॉटेल आणि विमान बुकिंग वाढल्या आहेत. त्यात भारत पाकिस्तान सामना अती खास ठरत आहे. विविध शहरांतून अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइट्सचे दर वाढले आहे. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप सामने सुरू होणार आहेत. तर भारत-पाकिस्तानमधील सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
चेन्नई अहमदाबाद तिकीट 45 हजार रुपये
चेन्नई-अहमदाबाद जाण्या-येण्याचे तिकीट सर्वसामान्यपणे 10 हजार रुपये असते. मात्र, 15 ऑक्टोबरला तिकिट सुमारे 45 हजार रुपये आहे. त्यामुळे तीन महिने आगोदर जरी तिकीट बुक करत असाल तरी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.
मुंबई दिल्लीचे दरही वाढले
मुंबई आणि दिल्लीवरून अहमदाबादला जात असाल तर विमानाचे तिकीट 300 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. "अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइट्सचे दर वाढले आहेत. क्रिकेट सामन्यांमुळे ही मागणी वाढली. स्पर्धेची सुरुवात आणि शेवटच्या सामन्यांसाठी अद्याप प्रवास भाडे जास्त वाढले नाही. मात्र, भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांची तिकीट बुक करण्यासाठी चढाओढ लागली आहे. हॉटेल आणि विमान तिकीट बुकिंगसाठी मागणीही वाढली आहे, असे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.
पिक आवर्स म्हणजेच रहदारीच्या वेळी विमानप्रवास भाडे आणखीनच वाढले आहे. अहमदाबाद शहरातील प्रमुख शहरांतील आलीशान हॉटेलमधील बुकिंगही वाढली आहे. 60% हॉटेलमधील जागा तीन महिने आधीच बुक झाल्या आहेत. क्रिकेट फॅन्स ग्रुप्स, व्हीआयपी, कॉर्पोरेट्स, टीम आणि स्पॉन्सर्सकडून तिकीट बुकिंगसाठी चौकशी वाढल्याचेही ट्रॅव्हल एजंटने सांगितले.