Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tourism In India: केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि Airbnb मध्ये करार; 'Visit India 2023' अभियान राबवणार

Foreign tourist arrivals

भारतातील सांस्कृतिक आणि हेरिटेज टुरिझम वाढावे यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि Airbnb कंपनीमध्ये करार करण्यात आला आहे. 'Visit India 2023' या अभियानाद्वारे जगभरात भारतीय पर्यटनाचा प्रसार करण्यात येईल. पर्यटनस्थळी सुविधा उभारण्याबरोबरच स्थानिक रोजगार आणि नवउद्योजक निर्मितीचेही लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Tourism In India: कोरोना साथीदरम्यान जागतिक पर्यटन कमालीचे रोडावले होते. मात्र, आता पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने Airbnb या टुरिझम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसोबत करार केला आहे. सोबतच 'Visit India 2023' हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे भारतात सांस्कृतिक आणि वारसा स्थळांचे पर्यटन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.

भारतात परदेशी पर्यटकांची संख्या किती?

2022 वर्षात भारतामध्ये 60 लाखांपेक्षा जास्त पर्यटक आले होते. त्याआधीच्या म्हणजे 2021 वर्षात फक्त 15 लाख परदेशी पर्यटकांनी भारताची सफर केली. कोरोना प्रसार होण्यासाठी 2019 साली भारतात 1 कोटींपेक्षा जास्त पर्यटक आले होते. कोविडच्या आधी जेवढे पर्यटक भारतात येत होते तेवढे पर्यटक पुन्हा मिळवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी 'Visit India 2023' हे अभियान राबवण्यात येत आहे. 

'Soul of India' संकेतस्थळ सुरू करणार

परदेशी पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी खास Soul of India हे संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. भारतीय वारसास्थळे, सांस्कृतिक पर्यटन स्थळे यांची माहिती देणारी ही एक मायक्रो वेबसाइट असेल. ही वेबसाइट आंतरराष्ट्र्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुरू करण्यात येईल.

भारतातील ज्या पर्यटन स्थळांचा विकास झाला नाही अशी पर्यटनस्थळे विकसित केली जातील. पर्यटनस्थळी पर्यटकांना सुविधा मिळाव्यात यासाठी स्थानिक स्तरावर उद्योजक तयार करण्याचे कामही या अभियानाद्वारे केले जाणार आहे. यातून रोजगार निर्मितीही होईल. तसेच पर्यटनस्थळी राहण्याच्या सुविधाही उभारण्यात येतील.

एअरबीएनबी कंपनी बद्दल

Airbnb ही जागतिक स्तरावर पर्यटन सेवा पुरवणारी कंपनी आहे. हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल प्लॅनिंग, होम स्टे सह अनेक सेवा पुरवते. कंपनी ब्रोकरेज तत्वावर काम करून नफा कमावते. या कंपनीचे जगभरात कार्यालये असून आंतरराष्ट्रीय टुरिझम क्षेत्रातही मोठे नाव आहे. त्यामुळेच भारतीय पर्यटन मंत्रालयाने कंपनीसोबत करार केला. जागतिक स्तरावर भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी कंपनी सरकारसोबत मिळून काम करणार आहे. 

परदेशी पर्यटनातून सरकार किती पैसा कमावते?

परदेशी पर्यटक भारतात येतात तेव्हा ते डॉलरमध्ये पैसे खर्च करतात. यातून भारतीय तिजोरीत परकीय चलन येते. तसेच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. विमान कंपन्या, हॉटेल, टुरिझम कंपन्या, गाइड, स्थानिक बाजारपेठेलाही त्याचा फायदा होतो. 2021 वर्षात भारताने परदेशी पर्यटनातून 1 लाख 34 हजार 543 कोटी रुपये कमावले.