Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air India खरेदी करणार 500 नवीन विमानं

Air India

Tata Group कडे Air India चा ताबा गेल्यानंतर आता टाटा समुहाने आक्रमकपणे कंपनीच्या विस्ताराच्या योजना आखायला सुरुवात केली आहे. थेट विमान प्रवास ही एअर इंडियाची खासियत. त्यासाठीच आता कंपनीला 500 नवीन विमानं हवी आहेत.

टाटा समुहाकडे (Tata Group) एअर इंडियाच्या (Air India) विस्ताराच्या (Expansion) आक्रमक योजना तयार आहेत. आणि त्यासाठी 100 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी रक्कम कंपनी फक्त नवीन विमानं विकत घेण्यासाठी वापरणार आहे. एअर इंडिया ही देशातली अव्वल विमान वाहतूक कंपनी आहे. आता त्यांना देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 500 विमानं विकत घ्यायची आहेत. गेले काही दिवस ही बातमी नागरी विमान उड्डयण क्षेत्रात गाजतेय. कारण, एअर इंडियाची विमान खरेदी ठरल्याप्रमाणे पार पडली तर विमान प्रवासाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर तो एक विक्रम असेल. आणि या क्षेत्रालाही त्यातून नवसंजीवनी मिळणार आहे.    

म्हणजे असं की, कोरोना काळात आधीच जागतिक स्तरावर विमान प्रवास क्षेत्रं मरगळलेल्या अवस्थेत आहे. आता कुठे विमान प्रवासी वाढले असले तरी प्रत्यक्ष विमान बांधणी आणि पायाभूत सुविधा उभारणी उद्योग अजून सावरलेले नाहीत. अशावेळी एअर इंडियाची 500 विमानांची ऑर्डर जागतिक स्तरावर महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच या प्रस्तावित विमान खरेदीची एवढी चर्चा होतेय. खुद्द टाटा सन्सनी या बातमीला दुजोरा दिलेला नसला तरी जागतिक स्तरावर ही बातमी सध्या गाजतेय.    

एअर इंडिया कुठली विमानं खरेदी करणार? What Aircrafts would Air India Buy?  

अगदी सुरुवातीपासून थेट विमान सेवा (Direct Flights) ही एअर इंडियाची खासियत आहे. भारतातून न्यू यॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, युरोपमध्ये लंडन, पॅरिस अशा थेट सेवांना लोकांची नेहमीच पसंती असते. आताही टाटा एअर इंडियाने मागच्या काही महिन्यांमध्ये आणखी काही थेट विमान सेवांना सुरुवात केली आहे. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांसाठी किंवा त्यांना भेट देणाऱ्या भारतीय नातेवाईकांसाठी अशी थेट सेवा उपयोगी पडते.    

अशा थेट सेवांसाठीच कंपनीला आणखी विमानांची गरज असल्याचं बोललं जातंय. यातली 400 विमानं लहान आकाराची तर 100 विमानं आकाराने मोठी असतील. त्यासाठी एअरबस आणि बोईंग या कंपन्यांबरोबर एअर इंडियाची बोलणी सुरू आहेत. एअरबस A350 आणि बोईंग 787, 777 या विमानांना नेहमीच एअर इंडियाने पसंती दिली आहे.    

विमान खरेदीबरोबरच एअर इंडियामध्ये आक्रमक नोकर भरतीलाही सुरुवात झाली आहे. नुकतीच कंपनीने गोव्यासाठी नोकर भरती करण्यासाठी वॉक-इन मुलाखतींचा कार्यक्रम तिथल्याच एका हॉटेलात ठेवला होता. त्याच धरतीवर इतरही महत्त्वाच्या शहरांमध्ये असे कार्यक्रम सुरू आहेत.   

प्रवासी विमानांची सगळ्यात मोठी ऑर्डर Highest Orders by Airliners  

आधी सांगितल्याप्रमाणे एअर इंडियाची ही ऑर्डर जर प्रत्यक्षात आली तर जगातली ती सगळ्यात मोठी विमानांची एकगठ्ठा ऑर्डर असेल. यापूर्वी अशी मोठी ऑर्डर अमेरिकन एअरलाईन्स या कंपनीने दिली होती. त्यांनी दहा वर्षांपूर्वी 460 बोईंग आणि एअरबस विमानं एकगठ्ठा खरेदी केली होती. आताही अमेरिकन एअरलाईन्स ही जगातली सगळ्यात मोठी विमान कंपनी आहे. आणि त्यांच्याकडे 930 विमानांचा ताफा आहे.    

मोठ्या ऑर्डरच्या बाबतीत भारतीय विमानसेवा कंपनी इंडिगोचंही नाव घेतलं जातं. त्यांनी विमान सेवा सुरू करताना 360 छोट्या आकाराची विमानं एकसाथ विकत घेतली होती. पण, ही सर्व विमानं छोट्या आकाराची आणि देशांतर्गत सेवांसाठी वापरली जाणारी विमानं आहेत.