टाटा ग्रुपने खरेदी केल्यानंतर स्वगृही परतलेल्या एअर इंडियाने आक्रमक विस्ताराची भूमिका स्वीकारली आहे. एअर इंडियाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी टाटा समूहाने प्रचंड गुंतवणुकीचा आणि फेररचनेचा प्लॅन आखला आहे. नवीन विमाने मिळाल्यानंतर एअर इंडियाकडे तब्बल 840 विमानांचा ताफा असेल. सध्याची एअर इंडियाची विमानांची संख्या आणि मनुष्यबळ पाहता पुढील 10 वर्षात चार पट अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल. एअर इंडियाला लवकरच हजारो पायलट्स आणि केबिन क्रूची भरती करावी लागणार आहे.
नुकताच एअर इंडियासाठी एकूण 470 नव्या विमानांची ऑर्डर देण्यात आली. त्याचबरोबर सध्याची जुनी विमाने बदलून त्याऐवजी टप्प्याटप्यात 370 पर्यायी विमानांची खरेदी होणार आहे. एअरबस आणि बोइंग या दोन विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून पुढील 7 ते 8 वर्षात नवीन विमाने एअर इंडियाला सुपूर्द केली जातील.ही या विमानांना सेवेत सामावून घेताना कुशल पायलट्स आणि केबिन क्रूची मोठ्या संख्येने गरज भासणार आहे. एअर इंडिया व्यवस्थापनाकडून लवकरच पायलट्स आणि केबिन क्रूची भरती केली जाण्याची शक्यता आहे.
सध्या टाटा समूहाकडून एअर इंडियातील कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला जात आहे. टाटा समूहाने एअर इंडियावर मालकी मिळवल्यानंतर जुन्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएस योजनेचा प्रस्ताव दिला होता. अनेक विभागांमध्ये मनुष्यबळाची फेररचना करण्यात आली आहे. नवीन विमानांची महाकाय ऑर्डर पाहता एअर इंडियाला पुढील दहा वर्षात किमान 6500 पायलट्सची गरज भासेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
एअर इंडियाकडे निधीची कमतरता असल्याने मागील काही वर्षांत विमानांची देखभाल करता आली नाही. अनेक विमानांची अंतर्गत रचना खराब झाली आहे. यामुळे एअर इंडियाची प्रतिमा मलीन झाली होती. ही विमाने पुढील काही वर्षात टप्प्याटप्यात बदलण्यात येतील, अशी माहिती एअर इंडियाचे चीफ कर्मशिअल अॅंड ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर निपुण अगरवाल यांनी दिली. ते म्हणाले की नवीन विमाने आधुनिक इंटिरिअर आणि इंधन कार्यक्षम असतील, ज्यामुळे कंपनीला नफा मिळवण्यास मदत मिळेल, असे अगरवाल यांनी सांगितले. दिर्घ पल्ल्याच्या नॉन स्टॉप प्रवासासाठी देखील 40 नवीन विमानांची ऑर्डर करण्यात आली आहे.
येत्या काही वर्षात एअर इंडियाला हजारो पायलट्स, इंजिनीअर्स, केबिन क्रू, एअरपोर्ट मॅनेजर्स आणि ग्राउंड स्टाफची गरज भासणार आहे. त्यामुळे कौशल्य असलेल्या तरुणांना हवाई क्षेत्रात नोकरीच्या प्रचंड संधी असतील.
Table of contents [Show]
कोणत्या विमानासाठी किती पायलट्स आवश्यक
Aircraft | Pilots |
A350 | 30 |
Boeing 777 | 26 |
Boeing 787 | 20 |
Airbus A320 Or Boeing 737 Max | 12 |
एअर इंडिया ग्रुपकडे 3000 पायलट्सची टीम
सध्या एअर इंडिया समूहातील एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आमि एअर एशिया इंडिया या कंपन्यांची मिळून एकूण 220 विमाने असून 3000 हून अधिक वैमानिक आहेत. यात एअर इंडियाचे 1600 पायलट्स आहेत. एअर इंडियाकडे 113 विमानांचा ताफा आहे. मात्र अपुरा स्टाफ असल्याने कंपनीवर फ्लाईट रद्द करण्याची नामुष्की ओढवल्याचे मागील काही महिन्यांत दिसून आले आहे. एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशिया इंडिया या दोन कंपन्यांचे मिळून एकूण 850 पायलट्स आहेत. विस्ताराकडे 600 पायलट्सची टीम आहे.
पायलट्ससाठी ट्रेनिंग अकादमी
एअर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर कॅम्बेल विल्सन यांनी यापूर्वीच नव्या पायलट्सना प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक दर्जाची ट्रेनिंग अकादमी सुरु करणार असल्याचे म्हटले होते. एअर एशिया इंडियाचे माजी सीईओ सुनिल भास्करन यांच्या नेतृत्वात टाटा ग्रुप पायलट ट्रेनिंग अकॅडमी सुरु करणार आहे. त्यामुळे हजारो नव्या कमर्शिअल पायलट्ससाठी एअर इंडियात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
एअरपोर्टवरील विविध सेवांसाठी हजारो नोकरीच्या संधी
विमानतळांवरील विविध सेवांसाठी हजारो प्रत्येक विमान कंपनीचे शेकडो कर्मचारी चोविस तास विविध पाळींमध्ये काम करतात. विमानतळांवरील सेवांसाठी एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड ( AI Airport Services Limited) या कंपनीकडून क्षेत्रनिहाय भरती केली जाते. यात रॅम्प मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ड्युटी मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर, कस्टमर केअर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह अशा पदांसाठी भरती होते. या नोकऱ्या कंत्राटी पद्धतीच्या असतात.
अमेरिकेत 10 लाख रोजगार निर्माण होणार
एअर इंडिया आणि बोइंग यांच्यात झालेल्या 220 विमान खरेदीच्या कराराने अमेरिकेत नोकऱ्यांचा महापूर येणार आहे. बोइंग ही अमेरिकेतील विमान निर्मितीतील जागतिक पातळीवरी आघाडीची कंपनी आहे. या ऐतिहासिक कराराचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी कौतुक केले आहे. एअर इंडियाच्या करारामुळे अमेरिकेत तयार होणाऱ्या 220 नवीन विमानांसाठी लाखो अमेरिकन नागरिकांना रोजगार मिळेल. अमेरिकेतील 44 राज्यांमधील किमान दहा लाख अमेरिकन नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असे मत बायडन यांनी व्यक्त केले आहे. याबाबत व्हाईट हाऊसकडून निवदेन जारी करण्यात आले होते. एअर इंडिया आणि बोइंगमधील करार भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबधांना आणखी मजबूत करेल, अशा अशावाद व्हाईट हाऊसकडून व्यक्त करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारी 2023 रोजी एअर इंडिया आणि बोइंग यांच्या करार झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवर चर्चा झाली होती.