Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air India's record aircraft order: एअर इंडियाच्या विमान खरेदी करारानंतर लोकांना पडतायेत हे 5 प्रश्न, कोणते ते जाणून घ्या

Air India's record aircraft order

Image Source : www.aerotime.aero

Air India's record aircraft order: मंगळवारी( 14 फेब्रुवारी) एअर इंडियाने (Air India) अमेरिकेतील बोईंग (Boeing) आणि फ्रान्सच्या एअरबस (Airbus) या कंपन्यांसोबत 470 विमान खरेदीचा करार केला. याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून होतं. या करारानंतर लोकांना काही प्रश्न पडले आहेत. ज्याची उत्तरं ते गुगलच्या (Google) मदतीने शोधत आहेत. असे कोणते 5 प्रश्न वारंवार लोकं विचारत आहेत हे जाणून घ्या.

टाटा समूहाने एअर इंडियाची (Air India) धुरा हाती घेतल्यापासून अनेक वेगेवगेळे बदल करायला सुरुवात केली आहे. या बदलांमध्ये व्यवस्थापनापासून ते परिचालनापर्यंत अनेक गोष्टी बदलत असताना कंपनीने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने अमेरिकेतील बोईंग (Boeing) आणि फ्रान्सच्या एअरबस (Airbus) या कंपन्यांसोबत एक करार केला आहे. ज्या अंतर्गत एअरबसकडून 250 नवीन एअरक्राफ्ट आणि बोईंगकडून 220 मोठी विमाने खरेदी केली जातील.

महत्त्वाचं म्हणजे या विमानांची इंजिनं इंग्लंडमध्ये तयार केली जातील. त्यामुळे नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की, या कराराचा फायदा हा 4 देशांना होणार आहे. गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण जग एअर इंडियाचं कौतुक करत आहे. असं असलं तरीही सर्वसामान्य माणसाला या करारानंतर अनेक प्रश्न पडत आहेत. त्याची उत्तरं मिळवण्यासाठी साहजिकच ते गुगलची मदत घेतात. गुगलवर (Google) कोणते 5 प्रश्न लोकं वारंवार विचारत आहेत हे जाणून घेत, त्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

एअर इंडिया इतकी विमाने का खरेदी करत आहे?

एअर इंडियाने 2006 पासून कोणतंही नवीन विमान खरेदी केलेलं नाही. याविरुद्ध  मार्केटमधील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी यामध्ये वाढ केल्याचे दिसून येत आहे. याच कारणामुळे एअर इंडियाला देशांतर्गत (Domestic) आणि आंतरराष्ट्रीय (International) मार्केटमध्ये स्थान मिळवता आलं नाही. हे स्थान देशात आणि परदेशात मिळवण्यासाठी एअर इंडियाला जास्त क्षमता असलेली विमानं गरजेची होती. या करारानंतर कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर नवीन विमानांची संख्या असेल. ज्यामुळे अनेक सुविधा ग्राहकांना देणं कंपनीला शक्य होईल.

याशिवाय  Air India आणि Air India Express च्या ताफ्यात असलेल्या विमानांना बदलून आधुनिक विमानं सेवेत आणणं गरजेचं आहे. नवीन आधुनिक विमानांमुळे 15 टक्क्यांपर्यंत इंधनाची बचत होते.

मोठ्या ऑर्डरचे फायदे काय आणि ती आत्ताच करण्याचं कारण?

मोठ्या ऑर्डरमध्ये कायम मोठी सवलत मिळू शकते. त्यासाठी एअरलाईन कंपनीला वाटाघाटी करताना मदत मिळते. अशी सवलत छोट्या व्यवहारामध्ये मिळत नाही. नवीन खरेदी केलेली विमाने ही आधुनिक पद्धतीची आहेत. या विमानाच्या सेवेमधून अर्थार्जन होण्यास मदत होईल. सोप्या पद्धतीने समजून घेतलं तर जितकी जास्त विमानं तेवढा जास्त वाहतुकीचा आवाका आणि तेवढाच जास्त त्यातून मिळणारा पैसा. यामुळे कॅश फ्लो (Cash Flow) चालू राहण्यासाठी मदत होईल.

कोविड महामारीमध्ये अनेक एअरलाईनचे कंबरडं मोडलं होतं. व्यवसाय ठप्प सुद्धा झाला होता. मात्र आता परिस्थिती थोडी स्थिरस्थावर होताना पाहायला मिळत आहे. लोक बाहेर प्रवासासाठी पडत आहेत. अशा परिस्थितीत या इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रतिस्पर्धी आहेत. या प्रतिस्पर्ध्यांमध्ये टिकून राहण्यासाठी आणि व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरेल.

भारतीय विमान वाहतुकीला या ऑर्डरमुळे कशी मदत होईल?

सध्या सरकार देशांतर्गत विमान वाहतुकीस चालना देतंय. ज्या आधारे देशात अनेक विमानतळांची उभारणी केली जाणार आहे. याचाच अर्थ येत्या काळात भारतातील विमान वाहतूक अनेक वेगवेगळ्या मार्गांवर विकसित होणार आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल.  

ग्राहकांना चांगल्या दरात तिकीट (Ticket Price) उपलब्ध करून देण्यासोबत चांगली सेवा (Facility) मिळावी हा देखील यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. जितके जास्त प्रतिस्पर्धी तितकी जास्त स्पर्धा असं साधं सोपं गणित यामध्ये आहे. या स्पर्धेमुळे विमान वाहतूक करण्याऱ्या वर्गाचा आवाका वाढेल, ज्याचा परिणाम तिकीट दरावर, सेवेवर झाल्याचे पाहायला मिळेल.

सध्या देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये इंडिगो (IndiGo Airline) कंपनीचा जवळपास अर्धा हिस्सा आहे. यामागे त्यांची जास्त असलेली विमान संख्या हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. एअर इंडियाच्या या करारानंतर देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय वाहतुकीमध्ये अनेक कंपन्यांना एअर इंडिया तगडी स्पर्धा देऊ शकतं.

भारतीय विमानतळांवर इतकी विमाने कशी सामावली जातील?

भारताच्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पानंतर हे पक्के लक्षात आले आहे की, हे सरकार सामाजिक पायाभूत सुविधांवर (Social Infrastructure Facility) मोठा खर्च करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे देशांतर्गत विमान वाहतुकीकरिता 50 नवीन विमानतळं (New Airport) उभारली जाणार आहेत.

एअर इंडियाने केलेला या करारानंतर जेव्हा केव्हा ही विमान भारतात येतील, तो पर्यंत सरकारकडून आणि एअर इंडियाकडून जागेची तशी तरतूदही करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय दिल्ली (Delhi) आणि मुंबईजवळील (Mumbai) नवीन विमानतळे सरकारकडून लवकरच कार्यान्वयीत होतील असाही अंदाज वर्तवला जातोय.

एअर इंडियाच्या भविष्यातील योजना काय आहेत?

2023 च्या अखेरीस एअर इंडिया एक्स्प्रेस (Air India Express) अंतर्गत कमी किमतीच्या वाहकांचे आणि 2024 पर्यंत एअर इंडियाच्या अंतर्गत पूर्ण-सेवा वाहकांचे विलीनीकरण करण्याची योजना टाटा ग्रुपकडून (Tata Group) आधीच जाहीर केली आहे. या नवीन विमानांची ऑर्डर मिळेपर्यंत, एअर इंडियाने भाडेतत्त्वावर विमाने समाविष्ट केली आहेत.

एअर इंडिया जागतिक स्तरावर (International Service Provided) आता आपली सेवा विस्तारणार आहे. याशिवाय भारतातील विमान वाहतुकीमध्ये प्रवास करणाऱ्या वर्गाची संख्या वाढवण्याचे उद्दिष्ट ही त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.