Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air India Maharajah mascot: आयकॉनिक महाराजा मॅस्कॉट एअर इंडियाच्या विमानांवर दिसणार नाही

Air India

बदलत्या काळानुसार एअर इंडिया नव्या रुपाने ग्राहकांच्या समोर येणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे एअर इंडियाच्या पारंपरिक महाराजाच्या वेषातील मॅस्कॉटची ओळख पुसली जाणार आहे. कंपनी विमान सेवेचे नव्याने ब्रँडिंग करणार असून त्यानुसार अनेक बदल पाहायला मिळतील.

Air India Maharajah Mascot: विमानसेवा कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झालीय. अशातच एअर इंडिया आपली ओळख बदलणार आहे. मागील वर्षी टाटा ग्रूपने सरकारकडून एअर इंडिया विकत घेतली. तेव्हापासून नफा वाढवण्यासाठी कामकाजात अनेक बदल करण्यात आले आहेत. आता कंपनी एअर इंडियाच्या ब्रँडिंगसाठी मोठा पैसा खर्च करणार आहे. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे 1946 पासून एअर इंडियाच्या विमानांवर दिमाखात असलेले महाराजा चिन्ह (मॅस्कॉट) कंपनी काढून टाकणार आहे.

एअर इंडियाला नवी ओळख मिळणार

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून एअरलाइन्सचे रिब्रँडिंग करण्यात येत आहे. या अंतर्गत कंपनीच्या विमानाचा रंग देखील बदलणार आहे. मार्च 2024 पर्यंत टाटा ग्रूपची विस्तारा आणि एअर इंडिया दोन्ही कंपन्यांचे एकत्रीकरण होईल. विस्तारा एअरलाइन्सच्या लोगोमधील जांभळा रंग टाटा एअरलाइन्सच्या विमानावर कदाचित दिसू शकतो.

पुढील वर्षी Airbus A350 ही विमाने एअरलाइन्सच्या ताफ्यात दाखल होतील. नवे बदल या नव्या विमानांवर दिसण्याची शक्यता आहे. 

आयकॉनिक महाराजा मॅस्कॉट

एअर इंडियाच्या लोगो आणि मॅस्कॉट वेगवेगळा आहे. 1946 पासून पारंपरिक महाराजाच्या वेषातील मॅस्कॉट एअर इंडियाच्या विमानांवर आहे. या मॅस्कॉटमधून भारतीय परंपरा आणि टाटा ग्रूपची स्वदेशीपणा ठळकपणे उठून दिसतो. महाराजा चिन्हावरूनच एअर इंडियाची ओळख ग्राहकांना होते. मात्र, आता बदलत्या काळानुसार कॉर्पोरेट आणि बिझनेस ग्राहकांवर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. हे चिन्ह कालबाह्य झाल्याचे कंपनीचे मत आहे. 

बँडिंगसाठी कोट्यवधीचा खर्च 

एअर इंडियाची ब्रँडिंग निती आखण्यासाठी कंपनीने लंडन स्थित फ्युचर ब्रँड या कन्सल्टंसी फर्मला काम दिले आहे. त्यांच्याकडून विमानांचा रंग, लोगो, मॅस्कॉट आणि मार्केटिंग कसे असावे याबाबत मार्गदर्शन घेतले जाईल. लंडन ऑलम्पिक 2012, ब्रिटिश आलिशान कार कंपनी बेन्टली, अमेरिकन एअरलाइन्स अशा कंपन्यांचे ब्रँडिंग फ्युचर ब्रँड या फर्मने केले आहे. 

कदाचित कंपनी एअरपोर्ट लाउंज आणि इतर काही प्रिमियम सेवांसाठी महाराजा मॅस्कॉट वापरू शकते. मात्र, विमानांवर हे मॅस्कॉट दिसणार नाही. 

एअर इंडियाला नवी ओळख कधी मिळणार? 

एअर इंडियाचे नवे ब्रँडिंग कम्पेन चालू वर्षी ऑगस्टपर्यंत लाँच केले जाऊ शकते. डिजिटल आणि प्रिंट माध्यमात जाहिरात कशी असावी यासाठी मॅकॅन ग्रूप या जाहिरात एजन्सीकडे काम दिले आहे. प्रसून जोशी मॅकॅन ग्रूपचे प्रमुख असून एअर इंडियासाठी ते काम पाहणार आहेत. प्रसून जोशी यांनी भारतात अनेक कंपन्यांसाठी यशस्वी जाहिरातींचे कॅम्पेन केले आहे.