गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासात काही नागरिकांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आणि विमान कंपन्यांनी आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सहप्रवासी असलेल्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना कुठल्याही आदिअडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी नियमांमध्ये महत्वाचे बदल केले जाणार आहेत.
धोरणातील बदलाची कारणे
टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गेल्या काही दिवसांत दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांनी केलेल्या अयोग्य वर्तन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. सुधारित धोरणात नेमके काय बदल झाले आहेत हे एयर इंडियाकडून अजूनही जाहीर करण्यात आले नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याबाबत विमान कंपन्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्याआधारे विमान कंपन्यांना आपापले धोरण आखावे लागणार आहे.
जाणून घ्या काय आहेत सूचना
सुधारित धोरणानुसार, चालक दलातील सदस्यांनी मद्यप्राशन सेवा दिल्याशिवाय प्रवाशांना स्वतः मद्यपान करण्याची परवानगी दिली जाणार नाहीये. याव्यतिरिक्त, क्रू मेंबर्सनी स्वतः मद्य प्राशन करणाऱ्या प्रवाशांची शहानिशा करण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक असणार आहे. धोरणानुसार, अल्कोहोलयुक्त पेये योग्य आणि सुरक्षित पद्धतीने दिली जाणे आवश्यक आहे. यामध्ये अतिथींना अतिरिक्त अल्कोहोल देण्यास नकार देण्याचा अधिकार देखील विमान कंपन्यांना असणार आहे.
विद्यमान धोरणाचे पुनरावलोकन करणार एअर इंडिया
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, विमान कंपनीने अमेरिकन नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन (NRA) च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित फ्लाइटमध्ये अल्कोहोल ऑफर करण्याच्या विद्यमान धोरणाचे पुनरावलोकन केले आहे, इतर एअरलाइन्सने अवलंबलेल्या पद्धतींच्या अनुषंगाने हे बदल केले आहेत. निवेदनात असे म्हटले आहे की हे मुख्यत्वे एअर इंडियाच्या विद्यमान पद्धतींशी सुसंगत असे बदल केले गेले आहेत. परंतु, विमान प्रवासात अल्कहोल सुविधा देण्यासाठी काही विशेष नियम आखले जात आहेत. भविष्यात कुठल्याही अनुचित प्रकारचा सामना करावा लागू नये यासाठी आणि नियमांच्या अधिक स्पष्टतेसाठी धोरणांमध्ये काही सुधारणा केल्या गेल्या आहेत, असे एअर इंडियाने म्हटले आहे. एअर इंडिया लवकरच याबाबत नियमावली जाहीर करू शकते.