Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air India Building : एअर इंडिया इमारत आता राज्यसरकारच्या मालकीची? इमारतीसाठी मोजणार 'इतके' पैसे

Air India Building

Image Source : www.en.wikipedia.org

Air India Building : मुंबईस्थित एअर इंडियाची इमारत लवकरच महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने 1600 कोटी रूपयाला ही इमारत विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Air India Building : मुंबईची शान आणि पर्यटकाचे मुख्य आकर्षण असलेली मुंबईतील आयकोनिक वास्तु म्हणजे एअर इंडियाची इमारत. एअर इंडियाची ही 23 मजली इमारत आणि त्याच्यावर असलेला एअर इंडियाचा लोगो ही मुंबईची ओळख बनली आहे. अशी ही ऐतिहासिक वास्तु लवकरच महाराष्ट्र सरकारच्या मालकीची होणार आहे.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने सध्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली ही इमारत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवहारासाठी राज्य सरकार 1600 कोटी रूपये मोजणार आहे.  

महाराष्ट्र सरकारचा निर्णय

2018 साली एअर इंडिया कंपनीने आर्थिक अडचणींच्या कारणास्तव ही इमारत विकण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही इमारत खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणूका आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतरामुळे हा व्यवहार मागे पडला. मे 2019 मध्ये तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने 1400 कोटी रूपयाला ही इमारत खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला पण हा व्यवहार यशस्वी झाला नाही.

त्यानंतर राज्यात शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची भेट घेतली. केंद्र सरकारने त्यांच्या अखत्यारित असलेली एअर इंडियाची ही प्रॉपर्टी   महाराष्ट्र सरकारला द्यावी यासाठी विनंती केली.  

महाराष्ट्र सरकारला का हवी एअर इंडियाची इमारत

जेव्हा एअर इंडियाने त्यांची ही इमारत विकण्याचा निर्णय तेव्हापासूनच महाराष्ट्र सरकार ही इमारत विकत घेण्याच्या प्रयत्नात आहे. मंत्रालयातील कार्यालयांचा विस्तार करण्यासाठी पुरेशा जागेची आवश्यकता आहे. तसेच मुंबईभर विखुरलेले सर्व सरकारी कार्यालये हे एकाच छताखाली यावीत, या उद्देशाने महाराष्ट्र सरकार ही इमारत विकत घेऊ इच्छिते.

मात्र, सध्या या इमारतीमध्ये केंद्र सरकारच्या जीएसटी आणि  आयकर विभागाच्या कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे ही कार्यालये येथुन हलवल्यानंतर पूर्ण शंभर टक्के ताबा मिळाल्यावरच राज्य सरकार व एअर इंडिया दरम्यानचा खरेदी व्यवहार पूर्ण होणार आहे.

एअर इंडियाच्या इमारतीसाठी इच्छुक खरेदीदार

एअर इंडियाच्या इमारतीचा आवाका आणि मुंबईतील मोक्याचे ठिकाण पाहता अनेक कंपन्यांनी या इमारतीच्या खरेदीसाठी तयारी दर्शवलेली. एलआयसीने 1200 कोटी रूपये किंमत लावलेली तर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) ने 1375 कोटी रूपये किंमत लावलेली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुद्धा ही इमारत खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केलेली.

एअर इंडिया इमारत

1974 साली एअर इंडियाची इमारत उभी राहिली. ही इमारत 23 मजल्याची असून एक मजला हा 10 हजार स्क्वेअर फुटचा आहे. दोन अंडरग्राऊंड पार्किंग मजले आहेत. या इमारतीला एकुण 1500 खिडक्या आहेत. समोर अथांग अरबी समुद्र आणि क्वीन नेकलेसच्या रोषणाईमुळे या इमारतीला एक वेगळीच झळाळी मिळाली आहे.

सुरूवातीला या इमारतीमध्ये एअर इंडिया एअरलाईन्स कंपनीच्या कार्यालयासह अन्य कॉर्पोरेट कार्यालये सुरू होती.  मात्र, 2013 मध्ये आर्थिक अडचणीमुळे एअर इंडियाने आपले कार्यालय मुंबईच्या इतर भागात हलवले आणि अधिकाधिक कार्यालये हे भाडेतत्वावर देण्यास सुरूवात केली. यावेळी एअर इंडियाला भाड्या तत्वावर दिलेल्या कार्यालयाच्या माध्यमातून वार्षिक 100 कोटीचे उत्पन्न मिळत होते.