लष्करातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निपथ योजना वर्ष 2022 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. सरकारी योजनांपैकी अग्निपथ योजनेबाबत नेटकऱ्यांनी गुगलवर सर्वाधिक चौकशी केल्याचे दिसून आले. 2022 मध्ये टॉप सर्चमध्ये अग्निवीर योजनेचे स्थान मिळवले आहे.
अग्निपथ योजनेविषयी गुगलवर सर्वाधिकवेळा चौकशी करण्यात आली.अग्निपथ योजना 14 जून 2022 रोजी केंद्र सरकारने जाहीर केली होती. देशातील तरुणांना सैन्याच्या तीनही दलात कामाची संधी मिळावी या उद्देशाने अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली होती.या योजनेतून पात्र उमेदवारांना भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल यामध्ये भरती होता येणार आहे.या योजनेत पात्र उमेदवारांना अग्निवीर म्हणून ओळखले जाणार आहे.त्यांना चार वर्ष सेवा करता येईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 17.5 ते 21 या वयोगटातील तरुणांसाठी अग्निपथ ही सैन्यदलात भरती होण्यासाठीची योजना मंजूर केली होती. या योजनेतील भरतीचे निकष पूर्ण केल्यास या तरुणांना थेट सशस्त्र दलात सामील होता येईल. अग्निपथ योजनेतून यावर्षी 46000 अग्निवीरांची भरती होणार आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ‘अग्निपथ’ योजनेच्या माध्यमातून तरुणांना सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी निर्माण करण्यासाठी सर्व उपयुक्त प्रयत्न केले जातील. या योजनेमुळे तरुणांना नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षित आणि शिकण्यास आणि त्यांच्या आरोग्याची पातळी सुधारण्यास मदत होईल. रोजगाराच्या वाढत्या संधींमुळे तरुणांना विविध क्षेत्रात नवीन कौशल्ये शिकायला मिळतील. अग्निपथ योजनेंतर्गत सशस्त्र दलाचा भाग असणारे उमेदवार ‘अग्निवीर’ असतील.