टोमॅटो, कोथिंबीर, तुर डाळ, हिरव्या पालेभाज्या यांचे भाव गगनाला भिडलेले असतानाच आता हिरव्या मिरचीचे देखील भाव शंभरी पार गेल्याचे दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिरव्या मिरच्यांची आवक कमी झालेली पाहायला मिळते आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर ग्रामीण भागातून शहरी भागात विक्रीसाठी येणाऱ्या हिरव्या मिरचीची आवक घटली आहे. पावसामुळे दळणवळणाच्या समस्या निर्माण झाल्या असल्याने मिरचीचे भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
30 ते 40 रुपये किलो दराने घाऊक बाजारात मिळणारी हिरवी मिरची आता 60-80 रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. मुंबई, ठाणे परिसरात हे भाव 100-120 रुपये किलो पर्यंत पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. हिरवी मिरची ही भारतीय स्वयंपाक घरातील नित्याची जिन्नस आहे. वाढत्या मिरचीच्या दरामुळे सामान्य नागरिकांचे स्वयंपाकाचे बजेट बिघडलेले पाहायला मिळते आहे. गेल्या एक महिन्यापासून म्हणजेच पावसाच्या आगमनापूर्वीपासून हिरव्या मिरचीचे दर वाढत आहेत असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
जी साधारण मिरची 30 ते 40 रुपये किलो दराने बाजारात सहजपणे उपलब्ध होती ती आता 60-80 रुपये किलो दराने विकली जात आहे. तर तिखट लवंगी मिरची 80 रुपये किलो दराने विकली जात आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे देखील भाजीपाला आणि इतर शेतीमालाचे उत्पादन घातले होते. मागणी जास्त आणि आवक कमी अशी परिस्थिती ओढावल्याने सध्या शेतीमाल महागड्या किमतीमध्ये बाजारात विकला जात आहे.
सध्या वाशी एपीएमसी बाजारात हिरव्या मिरचीची 50% आवक कमी झाली आहे. महाराष्ट्रात हिरव्या मिरचीचे उत्पादन कमी झाल्यामुळे दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेशमधून सध्या मिरची बाजारात येते आहे. वाहतुकीचा खर्च, देखभाल खर्च वाढल्यामुळे मिरचीचे देखील भाव वाढले आहे.