गेल्या काही दिवसांपासून किरकोळ महागाईच्या दरात होत असलेली वाढ सामान्यांच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. देशभरात कधी नव्हे ते टोमॅटोचे दर 250 किलो पर्यंत पोहोचले आहेत. याच्यात भरीस भर म्हणून कांद्याचे भाव देखील वाढले आहेत. मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्यामुळे हिरव्या पालेभाज्या, हिरवी मिरची आणि लसणाचे भाव देखील वाढल्याचे चित्र आहे. या सगळ्यात सामन्यांचे किचन बजेट बिघडवायला अद्रकने देखील हातभार लावलाय. होय, आता अद्रकचे भाव देखील महागले असून किरकोळ बाजारात आल्याची/ अद्रकाची किंमत 280 रुपये किलो नोंदवली गेली आहे. हेच अद्रक मागील महिन्यांत 80-100 रुपये किलो दराने विकले जात होते.
का महागली अद्रक?
पुढचे काही दिवस ‘अद्रकवाली चाय’ पिताना तुम्हांला अधिक पैसे मोजावे लागू शकतील. याचे कारण म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा अद्रक शेतीमाल शेतात नासला आहे. पावसामुळे वेळेत अद्रक बाजारात पोहोचवण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. खराब हवामानाचा परिणाम थेट अद्रक उत्पादनावर जाणवतो आहे. मागच्या महिन्यात धो धो कोसळणाऱ्या पावसाने बहुतांश भागात दडी मारली असली तरी शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळते आहे.
व्यापाऱ्यांची तक्रार
अद्रक साठवणूक हा एक महत्वाचा मुद्दा व्यापाऱ्यांसमोर उभा आहे. ओली अद्रक लवकर खराब होत असते, ती विकली न गेल्यास, बाजारात वेळेत न पोहोचल्यास खराब होण्याची, सडण्याची शक्यता अधिक असते. अशातच बाजारात येणारा माल कमी गुणवत्तेचा असून लवकर खराब होतो आहे अशी व्यापाऱ्यांची तक्रार आहे. परिणामी पुरवठा कमी झाल्याने आल्याच्या दरात वाढ झाली आहे.
अल्पकाळ राहील महागाई
रबीचे पीक बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीये, त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडले असल्याचे जुलै महिन्याच्या मासिक आर्थिक आढाव्यात वित्त मंत्रालयाने म्हटले होते. खरीपाचे पीक बाजारात उपलब्ध होण्यास ऑक्टोबर उजाडावा लागणार आहे. तोपर्यंत केंद्र सरकारला महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न आणि उपापयोजना कराव्या लागणार आहेत.
टोमॅटो, हिरवी मिरची, आले आणि लसूण यांसारख्या वस्तूंच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक महागल्यामुळे सामान्यांच्या खिशावर अधिक भार पडतो आहे.