गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे जिरे, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या यांच्या वाढत्या किमतीमुळे हैराण आहोत. अशातच सर्वसामान्यांच्या आहारातील महत्वाची तूर डाळ देखील महागली आहे. आधी अवकाळी पाऊस, मग लांबलेला उन्हाळा आणि आता मान्सूनमुळे निर्माण झालेली वाहतुकीची समस्या या सर्वांचा एकत्रित परिणाम तूर डाळीच्या किमतीवर पाहायला मिळतो आहे. भारतात अनेक राज्यांमध्ये तूर डाळीने 200 रुपये किलोचा टप्पा पार केला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे.
अवकाळी पावसानंतर तुरीचे वाढलेले दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने देखील विशेष प्रयत्न केले होते. तूर डाळीचा साठा करणारे व्यापारी आणि शेतकरी यांना तंबी दिली होती. तसेच स्टॉक डिस्क्लोजर पोर्टलवर तूरडाळींचा साठा व्यापारी,आयातदार यांनी लवकरात लवकर जाहीर करावा असे सरकारने म्हटले आहे. माहिती लपवल्यास दोषींवर कारवाई केली जाईल असेही सरकारने म्हटले आहे. एप्रिलनंतर तूर डाळीच्या किमतीत स्थिरता आल्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत.
ऑनलाइन स्टोअर्समध्ये चढ्या किमतीत विक्री
ऑनलाइन किराणा दुकानातील तूर डाळीच्या किमती पाहिल्यास, 28 जून रोजी बिग बास्केटवर एक किलो ब्रँडेड तूर डाळची किंमत 247 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. बिग बास्केटवर अर्धा किलोचे डाळीचे पॅकेट 100 रुपयांपेक्षा अधिक किमतीने विक्रीसाठी उपलब्ध आहे. डीलशेयर, ग्रोफर्स आणि झेप्टोवर देखील कमी जास्त प्रमाणात हेच भाव दाखवले जात आहेत. बहुतांश ठिकाणी तूर डाळीने 200 रुपयांचा आकडा पार केलाय.
तूरडाळ उत्पादनात देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रातून देशभरातील इतर राज्यांना तूर डाळ पुरवली जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला होता. त्यामुळे तुरीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी निघाले असल्यामुळे मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. तूरडाळीची प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत (MSP) ही 8558 रुपये असून सध्या बाजारात 9400-9800 प्रति क्विंटल दराने तूर डाळ विकली जात आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी भाववाढ असल्याचे म्हटले जात आहे.
6 महिन्यांत 37 टक्क्यांनी वाढ!
देशाच्या किरकोळ बाजारातील किमतींवर नजर ठेवणाऱ्या ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत निरीक्षण विभागानुसार, 26 जून रोजी अरहर डाळीची सरासरी किंमत 129.4 रुपये प्रति किलो आणि कमाल किंमत 180 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत तूर डाळीच्या कमाल किमतीत 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर सरासरी किंमत 17.15 टक्क्यांनी वाढली आहे.