एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक काल जाहीर झाले. येत्या 8 ऑक्टोबरपासून हे सामने खेळले जाणार आहेत. भारताचा सलामीचा सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासोबत चेन्नई येथे रंगणार आहे. तर भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडीयम येथे सामना रंगणार आहे. एवढेच नाही तर विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी याच मैदानावर रंगणार आहे.
भारत आणि पाकिस्तान अशी लढत असली की क्रिकेट रसिकांना वेगळाच हुरूप येत असतो. आता तुम्ही देखील अहमदाबाद येथे होणाऱ्या ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना लाइव्ह पाहण्याचा विचार करत असाल, तर लवकरात लवकर तुमचे हॉटेल बुकिंग करा. जितक्या उशिरा बुकिंग कराल तितके जास्त पैसे मोजावे लागतील हे लक्षात असू द्या!
अहमदाबादमधील हॉटेलच्या किमतीत वाढ
काल मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात आगामी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले गेले. या वेळापत्रकानुसार 15 ऑक्टोबरला गुजरातमधील अहमदाबाद येथे भारत विरुध्द पाकिस्तान असा सामना रंगणार आहे हे स्पष्ट झाले. तसेच 19 नोव्हेंबरला अंतिम सामना देखील याच शहरात रंगणार आहे हे देखील स्पष्ट झाले. त्यांनतर अहमदाबादमधील सर्व हॉटेलचे ऑक्टोबर महिन्यातील बुकिंग महाग झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही तासांमध्ये हॉटेल्सचे दर 5 ते 10 पटींनी वाढले आहेत.
How excited are you for the #INDvsPAK clash at Ahmedabad? ?
— OneCricket (@OneCricketApp) June 28, 2023
.
.
.#WorldCup #India #Pakistan #Cricket pic.twitter.com/2hFtd0aK9D
MakeMyTrip आणि Goibibo या हॉटेल बुकिंग पोर्टलवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात अहमदाबाद शहरातील हॉटेल्सच्या बुकिंग किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पाहायला मिळत आहेत.
ITC नर्मदा या पंचतारांकित हॉटेलमध्ये जिथे दोन रात्रींसाठी सर्वात स्वस्त खोलीची किंमत साधारणतः 64,000 रुपये असते, सध्या 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान 1,70,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे. सामन्य रूमचे बुकिंग तर उपलब्ध नाहीत असेच दाखवले जात आहे. तसेच शेरेटनची आणखी एक लक्झरी स्टे प्रॉपर्टी फोर पॉइंट्सवर देखील सामन्य रूम्स 5000 रुपयांपर्यंत बुक करता येतात, त्याच रूम सामन्यांच्या कालावधीत बुकिंगसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
फ्लाइटचे दरही वाढणार!
एकीकडे वर्ल्डकप सामन्यांमुळे अहमदाबाद-दिल्ली, अहमदाबाद-मुंबई आणि अहमदाबाद-चेन्नई या मार्गावर मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी प्रवास करण्याची शक्यता आहे. तसेच 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान अशी लढत होत असतानाच, त्या दिवशी नवरात्री उत्सव देखील सुरु होत आहे. गुजरातमध्ये नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदेशात आणि भारतातील विविध राज्यांमध्ये राहणारे गुजराती नागरिक नवरात्रीसाठी आपापल्या गावी जात असतात. याचा थेट परिणाम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर पाहायला मिळणार आहे.