गुंतवणुकीच्या विविध योजना सध्या सुरू आहेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund PPF), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana), पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम (Post Office Saving Scheme), सीनियर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम (Senior Citizens Saving Scheme) अशा विविध योजनांमध्ये नागरिक पैसे गुंतवणूक करत असतात. या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन आणि आधार क्रमांक अनिवार्य झालाय. लहान बचत योजनांसाठी केवायसीचा (Know Your Customer) भाग म्हणून हे बदल सूचित केले गेले आहेत.
Table of contents [Show]
मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक असेल तर...
केंद्र सरकारनं जारी केलेल्या या अधिसूचनेपूर्वी, आधार क्रमांक सादर केल्याशिवाय लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणं शक्य होत होतं. मात्र आतापासून सरकार पुरस्कृत लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर किमान आधार नोंदणी क्रमांक सादर करावा लागेल. तर एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर पॅन कार्ड सादर करावे लागणार, असं अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलंय.
सहा महिन्यांचा कालावधी
अर्थ मंत्रालयाच्या या अधिसूचनेनुसार, लहान बचत योजनेत सहभाग होऊ इच्छिणाऱ्यांनी पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफीस सेव्हिंग स्कीम या योजनांसह इतर कोणतंही लहान बचत खातं उघडताना त्यांचा आधार क्रमांक सबमिट करावा. तसं न केल्यास 30 सप्टेंबर 2023पर्यंत आधार क्रमांक सबमिट करावा लागेल. ज्या नवीन ग्राहकांना आधार क्रमांकाशिवाय कोणतीही लहान बचत योजनेत खातं काढायचं आहे, त्यांना खातं उघडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आधार क्रमांक द्यावा लागेल. जर एखाद्या लहान बचत योजनेच्या ग्राहकाला त्याचा आधार क्रमांक यूआयडीएआयकडून नियुक्त केला गेला नसेल तर एखाद्याचा आधार नोंदणी क्रमांक कार्य करेल.
...तर खातं गोठवलं जाईल
योजना सुरू करतेवेळी काही कारणास्तव आधार क्रमांक देता न आल्यास साधारणपणे 6 महिन्यांची मुदत दिली जाते. या कालावधीत आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक न जोडल्यास खातं उघडल्यानंतर सहा महिन्यांनंतर एखाद्याचं लहान बचत खातं गोठवलं जाऊ शकतं. आता जे योजनांचा लाभ घेत आहेत, त्या विद्यमान सदस्यांसाठी, 1 ऑक्टोबर 2023पासून त्यांचं खातं गोठवलं जाईल. त्यामुळे त्यांनी त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या लहान बचत खात्यासह दिलेल्या अंतिम मुदतीत भरणं गरजेचं आहे.
पॅनसाठी दोन महिन्यांची मुदत
लहान बचत खातं उघडण्याच्या वेळी पॅन सबमिट करणंही आता आवश्यक करण्यात आलंय. अधिसूचनेमध्ये तसा स्पष्ट उल्लेख जोडण्यात आला आहे. खातं उघडण्याच्या वेळीच पॅन सबमिट करावं. आधारला ज्याप्रमाणं 6 महिन्यांचा कालावधी आहे, तसाच इकडे देखील आहे, मात्र तो 2 महिन्यांचाच आहे.नेमकं कोणत्या प्रकरणांमध्ये ही सूट आहे, त्यावर एक नजर टाकूया...
- खात्यातील कोणत्याही वेळी शिल्लक पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असेल; किंवा
- कोणत्याही आर्थिक वर्षातील खात्यातल्या सर्व क्रेडिट्सची एकूण रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त असते;
- खात्यातून एका महिन्यात सर्व पैसे काढणं आणि हस्तांतरित करण्याची रक्कम एकूण दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असेल.
..तोवर खातं सुरू राहील
ठेवीदारानं या दोन महिन्यांच्या कालावधीत कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) सादर करावे. त्यात अडचणी आल्यास तो लेखा कार्यालयात कायमस्वरूपी खाते क्रमांक सबमिट करू शकतो. तोवर त्याचं खातं सुरू राहील. मात्र कालावधी संपल्यानंतर मात्र खात बंद होऊ शकतं. त्यामुळे कोणत्याही योजनेत तुम्हाला पैसे गुंतवण्यासाठी कायमस्वरुपी आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक तुमच्याजवळ असायलाच हवा.