बँकेतील पैशांचा व्यवहार हा पारदर्शक राहण्यासाठी आणि टॅक्स संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Taxes - CBDT) 10 मे, 2022 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार आर्थिक वर्षात एका किंवा अधिक बँक खात्यामधून 20 लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी आधार कार्ड आणि पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारने विशेषत: पॅनकार्ड (PANCARD) किंवा आधारकार्ड (Aadhar Card) शिवाय आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी हे नवीन नियम आणले आहेत.
नवीन नियमानुसार प्रत्येक व्यक्तीने एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक खात्यांमध्ये बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 20 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केल्यास किंवा काढल्यास संबंधित खातेदाराला पॅनकार्ड किंवा आधार कार्ड सादर करणे गरजेचे आहे. पोस्टातील खात्यामधून रक्कम काढण्यासाठीही हा नियम लागू होणार आहे. तसेच हा नवीन नियम बँकेत चालू खाते (Current Account) किंवा कॅश क्रेडिट खाते (Cash Credit Account) उघडण्यासाठी लागू असेल. हे नवीन नियम 26 मे, 2022 पासून लागू करण्यात येणार आहे.
नवीन नियम काय आहे?
रोख व्यवहार कमी करून डिजिटल पद्धतीचा वापर वाढवण्यासाठी तसेच बँकेतील पैसे काढणे आणि जमा करण्याचे व्यवहार ट्रॅक करण्यासाठी हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. तसेच एखाद्या व्यक्तीची बँकेच्या व्यवहारासंबंधी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळवणे. तसेच संबंधित खातेधारकाला टीडीएस (TDS) लागू आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी सरकारने हा नवीन नियम तयार केला आहे.
50 हजार रुपयांसाठी पॅन अनिवार्य!
यापूर्वी नियम 114B नुसार, एका दिवसात 50 हजार रुपयांपेक्षा अधिकची रोख रक्कम बॅंकेत भरताना पॅनकार्ड आवश्यक होते. पण रोख रक्कम जमा करण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी कोणतीही वार्षिक मर्यादा नव्हती, ती आता निश्चित करण्यात आली आहे.
नियम कधी लागू होणार?
हे नियम 26 मे 2022 पासून लागू होतील. त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने पॅनकार्ड किंवा आधारकार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांना व्यवहार करता येणार नाही. केंद्र सरकार या नियमाची अमलबजावणी कशी करावी याबाबत लवकरच नियमावली जाहीर करणार आहे. एकंदरीत मोठे व्यवहार करणाऱ्यांना आधीच तयारी करावी लागणार आहे.
दरम्यान, सरकारने आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च, 2022 पर्यंत वेळ दिला होता. त्यामुळे पॅन किंवा आधार कार्ड या दोन्हीपैकी एक कार्ड वरील व्यवहारांसाठी वैध मानले जाऊ शकते.
Image Source - https://bit.ly/3FE3eCM