काही वेळा आपल्याला अचानक पैशाची गरज निर्माण होते. यावेळी कर्ज घेण्याचा पर्याय तर आपल्यासमोर असतो. पण त्याचवेळी आपण यापूर्वी केलेली गुंतवणूकही आपली निर्माण झालेली पैशाची गरज पूर्ण करू शकते. मात्र, आपली गुंतवणूक मोडणे किवा कर्ज घेणे हा निर्णय घेणे इतके सहजही नसते. त्यासाठी वेगवेगळ्या मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
कर्जाचा दर आणि गुंतवणुकीवर परतावा यात काय जास्त आहे?
तुम्हाला कर्ज घेण्याचा जो पर्याय समोर आहे त्याचा व्याजदर किती आहे तो बघावा. हा दर जर गुंतवणूकीवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा (रिटर्न) जास्त असल्यास गुंतवणूक मोडणेच सामान्यपणे जास्त फायदेशीर ठरते. मात्र, गुंतवणूक कोणत्या प्रकारची आहे हे बघणे देखील या प्रश्नाचा विचार करताना महत्वाचे आहे. मुदत ठेव (एफडी) सारखी गुंतवणूक असेल तर हा फरक मोजणे सहज शक्य असते. कारण एफडीवर तुम्हाला किती टक्के व्याज मिळणार आहे, हे अगोदर निश्चित झालेले असते. जर मुदत ठेवीवर पाच ते सहा टक्के व्याज मिळत असेल आणि जर त्याला पर्याय म्हणून व्यक्तिगत कर्ज (पर्सनल लोन) घेणे शक्य असेल तर अशा वेळी एफडी मोडणेच योग्य निर्णय मानला जातो.
इक्विटीबाबत ‘हा’ निर्णय घेणे अवघड (Liquidity in Equity)
‘एफडी’सारखी गुंतवणूक असेल तर असा निर्णय घेणे सोपे असते. पण याऐवजी तुमच्याकडे इक्विटी मुच्युअल फंड किवा शेअर्स असतील तर हा निर्णय घेणे अवघड ठरते. इक्विटी मुच्युअल फंड काही वेळा 20 टक्क्यापेक्षा अधिक परतावा देताना दिसतात. एफडीपेक्षा अधिक रिटर्न मिळावेत म्हणूनच आपण त्यात गुंतवणूक केलेली असते. मग पैशाची निर्माण झालेली गरज भागवण्यासाठी ही गुंतवणूक मोडावी का, असा प्रश्न निर्माण होतो. पण याठिकाणी एक मुद्दा हा ही विचार करायला हवा की, इक्विटी मुच्युअल फंडातील रक्कम ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. मार्केट चांगली कामगिरी करत नसेल किवा तुमचा मुच्युअल फंड चांगली कामगिरी करत नसेल तर रिटर्न कमी देखील होऊ शकतो. यात एक मुद्दा असाही आहे, इक्विटी मुच्युअल फंड किवा शेअर्स यामध्ये दीर्घ कालावधीचा विचार करूनच गुंतवणूक केलेली असते. ज्यावेळी तुम्हाला पैशाची गरज निर्माण होते त्यावेळी आपण खरेदी केलेल्या शेअर्सची किमत कमी झालेली असेल तर आपल्याला नुकसान सोसावे लागते. हाच शेअर्स दीर्घ कालावधीनंतर कर्जावर द्याव्या लागणाऱ्या व्याजापेक्षा अधिक परतावाही देऊ शकतो. यामुळे याबाबतचा निर्णय काळजीपूर्वक घेणे आवश्यक आहे.
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक असल्यास काय करावे? (Liquidity In Real Estate)
तुमची पैशाची निर्माण झालेली गरज भागवण्यासाठी तुमच्याकडे रिअल इस्टेटचा पर्यायही असू शकतो. पण याबाबतीत तुमची पैशाची गरज किती आहे ते बघणे आवश्यक आहे. फ्लॅट व प्लॉटमध्ये गुंतवलेली रक्कम ही बहतेकवेळा मोठी असते. आणि ही गुंतवणूक सहजपणे मोकळी करता येत नाही. आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा रिअल इस्टेट प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कुणी मिळेल, याची खात्री देता येत नाही.
‘पीपीएफ’चा पर्याय योग्य आहे का? (Is PPF A Liquid Asset)
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमधील (पीपीएफ) मध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर सातव्या वर्षानंतर अंशत: रक्कम अकाऊंटमधून काढता येते. त्यामुळे हादेखील एक पर्याय उपलब्ध असतो. मात्र, काही कालावधीनंतर तुम्हाला पुन्हा पीपीएफ खात्यात पैसे भरायचे असतील तर त्यासाठी जास्तीत जास्तीत रकमेची मर्यादा देखील आहे. हा मुद्दादेखील पीपीएफ मधील पैसे काढताना विचारात घ्यायला हवा.
कर विषयक तरतुदींचाही विचार करावा (Taxation in India)
आपली पैशाची गरज भागवण्यासाठी एखादी गुंतवणूक मोकळी करण्याचा विचार करताना करविषयक तरतुदींचाही विचार करणे आवश्यक आहे. Assets च्या विक्रीनंतर जो भांडवली नफा होतो त्यावर कर द्यावा लागेल का? तो किती असू शकेल? हे मुद्देदेखील महत्वाचे ठरतात. अचानक निर्माण होणाऱ्या काही गरजांसाठी विम्याचा पर्याय असतो. ज्या खर्चाबाबत विम्याचा पर्याय उपलब्ध नसतो अशा एखाद्या संभाव्य गरजेसाठी आकस्मिक निधी म्हणून ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवत जाणेही बऱ्याचदा उपयुक्त ठरत असते.