Education Loan: मागील पाच वर्षात प्रथमच एज्युकेशनल लोन (Educational Loan) घेणाऱ्यांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. ही तशी सकारात्मक गोष्ट आहे. कारण उच्च शिक्षण घेण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे आणि यासाठी लोक कर्ज काढून चांगले शिक्षण घेत आहेत. पण त्याचबरोबर एज्युकेशनल लोनची रक्कम थकविणाऱ्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. ही तितकीच चिंतेची बाब आहे.
एज्युकेशन लोन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात एज्युकेशनल लोन थकविणाऱ्यांच्या टक्केवारीत 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षात शिक्षणासाठी कर्ज घेतलेल्यांकडून जवळपास 96,847 कोटी रुपये थकित आहेत. त्याच्या अगोदरच्या वर्षात म्हणजेच 2021-22 मध्ये ही थकित रक्कम 82,723 कोटी रुपये इतकी होती.
उच्च शिक्षण किंवा परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी अर्थात बँकांमधून कर्ज घेतले जाते. पण एकीकडे शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असताना, ते कर्ज थकित करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.
मागील 3 वर्षात शैक्षणिक कर्जाची मागणी रोडावली
मागील 3 वर्षांचा विचार करता 2019 पासून शैक्षणिक कर्जाला एवढी मागणी नव्हती. कदाचित कोविडमुळे त्याकाळात अनेक गोष्टींवर निर्बंधे आली होती. परिणामी शैक्षणिक कर्जाची मागणी मंदावली होती. 2021, 2020 आणि 2019 या वर्षांमध्ये एज्युकेशनल लोन घेणाऱ्यांची टक्केवारी अनुक्रमे 3 टक्के, 3.3 टक्के आणि 2.5 टक्के होता.
पण आता कोविडची परिस्थिती पूर्णत: आटोक्यात आल्यानंतर परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एज्युकेशनल लोनची मागणी वाढ लागली. पण तरीही अजून एज्युकेशन लोनच्या मागणीला तितकी मागणी नसल्याचे दिसून येते.
भारतातील उच्च शिक्षणासाठी बँकांकडून सावधिगिरी
भारतात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकांकडून कर्ज घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण इथेच राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे नोकरी मिळेल का? तसेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कर्ज फेडू शकतात का? अशा शंकांमुळे अनेक बँका भारतात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज देण्यासा टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते. तर काही बँका या कोर्स पाहून त्यातून मिळणाऱ्या पॅकेजवरूनही विद्यार्थ्यांना कर्ज देण्यास नकार देत आहेत.
बँकांकडून अशी भूमिका घेण्यामागचे कारण आरबीआयकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. कारण 2023 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत जवळपास 80,000 कोटी रुपये थकित असल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण वर्षाचा डेटा अजून उपलब्ध झालेला नाही. पण या आकडेवरून असे दिसून येते की, शिकण्यासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम थकित ठेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे.