Ramayana Cultural Center Nagpur: कोराडी येथे भारतीय विद्या भवनातर्फे रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महाकाव्य रामायणातील प्रसंग विविध चित्रांच्या स्वरूपात मांडलेले आहेत. चित्रांमधील घटना आणि व्यक्तिमत्त्वे समजून घेण्यासाठी येथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत माहिती देण्यात आली आहे. केंद्राच्या आतील सजावट ही राजवाड्यासारखीच असून, रंगसंगती, ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजना त्याच पद्धतीने करण्यात आली आहे.
क्रांतिकारकांची चित्र गॅलरी
तर दुसऱ्या माळ्यावरील दालनात १८५७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा सचित्र मांडण्यात आली आहे. तीन एकर जागेवर दक्षिण भारतीय शैलीत हे केंद्र उभारण्यात आले आहे. परमवीर चक्र प्राप्त २० सैनिकांची माहितीही या दालनात देण्यात आली आहे. एकूणच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर, भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित चित्र गॅलरी तयार करण्यात आली आहे.
नागरिकांना शुल्क आकारण्यात येणार
कोराडी येथे भारतीय विद्या भवनातर्फे उभारण्यात आलेल्या रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यासाठी 85 कोटी रुपयांच्या जवळपास खर्च करण्यात आला असल्याची शक्यता आहे. सांस्कृतिक केंद्र परिसरात 20 फूट उंचीची ग्रॅनाइटची मूर्ती आहे. यासह अनेक आकर्षक शिल्पे दालनाच्या परिसरात ठेवण्यात आले आहे. अद्वितीय अशा वास्तुशिल्पाची आंतरिक आणि बाह्य सजावट चेन्नई येथील कलाकारांनी केली आहे. हे सांस्कृतिक केंद्र नागपुरातील आकर्षणाचे प्रसिध्द ठिकाण म्हणून ओळखले जाईल. हे केंद्र 8 जुलै 2023 पासून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांकडून 30 रुपये तिकीट शुल्क आकारण्यात येणार आहे.