बदलत्या हवामानाचा फटका एयर कंडीशनर, फ्रीज आणि कुलर व्यावसायिकांना बसला आहे. खरे तर उन्हाळ्यात एसी, कुलर आणि फ्रीजला मोठी मागणी असते. उन्हाळ्यात आल्हाददायक वाटावं यासाठी एसी किंवा कुलर तसेच थंड पदार्थ खाता यावेत यासाठी फ्रीज खरेदी केले जातात.परंतु यंदा ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे एसी,कुलर आणि फ्रीजच्या विक्रीत 15% घट झाली आहे असे वृत्त आहे. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम आता व्यवसायावर दिसू लागल्यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या समस्यांचा सामना कसा कारायचा यावर व्यावसायिक विचार करत आहेत.
फेब्रुवारीत वाढवले होते उत्पादन
या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये भारतीयांनी उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) सामना केला होता. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट नागरिकांनी अनुभवली होती. यादरम्यान एसी, कुलर आणि फ्रीज उत्पादक कंपन्यांनी दुप्पट उत्पादन वाढवले होते. उन्हाळ्यात उत्पादने मोठ्या प्रमाणात विकली जातील अशी त्यांना आशा होती. परंतु एप्रिल महिन्याच्या मध्यानंतर महाराष्ट्रासह अनेक भागांत अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी तर गारपीट देखील झाली आहे. याचा थेट परिणाम एयर कंडीशनर, फ्रीज आणि कुलरच्या विक्रीवर बघायला मिळतो आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात ग्राहकांनी एसी, कुलर आणि फ्रीजची खरेदी पुढे ढकलली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये काही कंपन्यांची विक्री 15% पर्यंत कमी झाली आहे.
अल-निनोचा परिणाम जाणवेल
पश्चिम पॅसिफिक महासागरात हवेच्या दाबामुळे यंदा मोठ्या प्रमाणात हवामान बदल होणार असून, यावर्षी उन्हाळा अधिक जाणवणार आहे असे हवामान खात्याने आधीच सांगितलेले आहे. मे-जून महिन्यात भारतात उष्णतेची लाट येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. पॅनासोनिक लाइफ सोल्युशन्स इंडियाचे एसी ग्रुपचे बिझनेस हेड गौरव शाह माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “यंदा एप्रिलमध्ये भारतातील हवामान थंड होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत घट झाली आहे. परंतु अजून मे महिना बाकी आहे. येत्या 1-2 महिन्यात उष्मा वाढेल असा अंदाज आहे.”