75 Rupees Coin Launch: नवे संसद भवन दिल्लीमध्ये मोठ्या दिमाखात उभे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) नवीन संसद भवनाचे उद्घाटन रविवारी (दि. 28 मे 2023) करणार आहेत. याच दिवशी अर्थ मंत्रालयाकडून 75 रुपयांच्या नवीन नाण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामुळे भारतीय चलनात एका नव्या नाण्याची भर पडणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरी करण्याच्या उद्देशाने हे 75 रुपयाचे नाणे पाडण्यात आले आहे.
75 रुपयांचे नाणे नक्की आहे कसे?
अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी 75 रुपयांचे नवीन नाणे लॉन्च केले जाणार आहे. या नाण्याच्या एका बाजूस 'अशोक स्तंभ' (Ashoka Stambha) असून त्याच्या खाली 75 रुपये मूल्य असे नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय त्याचा उजव्या आणि डाव्या बाजूस हिंदी आणि इंग्रजी भाषेत 'भारत' असे लिहिण्यात आले आहे.
नाण्याच्या दुसऱ्या बाजूस नवीन संसद भवनाचे चित्र असून त्याच्या वरील बाजूस हिंदी भाषेत आणि खालील बाजूस इंग्रजी भाषेत 'संसद संकुल' (Sansad Sankul) असे लिहिले आहे. तसेच खालील बाजूस 'वर्ष 2023' लिहिण्यात आले आहे.
'या' धातुंपासून बनवले आहे 75 रुपयांचे नाणे
नवीन 75 रुपयांच्या नाण्यांचे वजन 35 ग्रॅम आहे. हे नाणे 44 मिलिमीटर व्यासासह गोलाकार आकाराचे असणार आहे. हे नाणे बनवताना 50% चांदीचा वापर करण्यात आला आहे. तर 40% तांब्याचा वापर करण्यात आला आहे. तसेच 5% झिंक आणि 5% निकेल धातूचा वापर करण्यात आला आहे. 75 रुपयांच्या नवीन नाण्याची निर्मिती भारत सरकारच्या कोलकत्ता (Kolkata) येथील टाकसाळीत केली जाणार आहे. अर्थ मंत्रालयाने हे नवीन नाणे फर्स्ट शेड्युल नियमांच्या आधारावर तयार केले आहे.
सध्या कोणत्या मूल्याची नाणी चलनात आहेत?
सध्या भारतीय चलनात 1 रुपया, 2 रुपया, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांचे नाणे चलनात आहे. 5 रुपयाच्या नाण्यांमध्ये एक जुने आणि दुसरे नवीन नाणे अस्तित्वात आहे. सध्या नवीन नाण्याची निर्मिती थांबवली आहे. या नाण्यांसोबत आता 75 रुपयांच्या नाण्याची चलनात भर पडणार आहे.