महाराष्ट्रातून इतर राज्यात एखादा प्रकल्प किंवा गुंतवणूक जाण्याच्या घटना सुरुच आहेत. गेल्या वर्षातील अशीच एक घटना घडली असून उद्योजकाला खंडणी आणि धमक्यांचे फोन आल्याने त्याने महाराष्ट्रा ऐवजी कर्नाटकाची निवड केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्योजकांना त्रास देणाऱ्या गैरप्रवृत्तींविषयी पोलीसांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.
जून 2022 मध्ये राज्यात सत्ता परिवर्तन झाले होते. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केले. शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असून त्यांच्याकडे राज्याचे गृह खाते आहे. नुकताच पुण्यात एका कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6000 कोटींची गुंतवणूक कर्नाटकात गेल्याची माहिती दिली.
फडणवीस म्हणाले की, वर्षभरापूर्वी एका उद्योजकाला महाराष्ट्रात 6000 कोटींची गुंतवणूक करायची होती. मात्र त्यावेळी त्याला खंडणी आणि धमक्यांचे फोन आले होते. ज्यातून वैतागून अखेर या उद्योजकाने महाराष्ट्राऐवजी कर्नाटकात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पोलीसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे असे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील युवकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे काहीजण उद्योजकांना धमक्या देणे, खंडणीसाठी त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. असे प्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले. असे प्रकार करणारा व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असला तरी पोलीसांनी यात कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश फडणवीस यांनी दिले.