ICC World Cup 2023 सामन्यांचा फिवर चाहत्यांना आतापासून चढला आहे. 5 ऑक्टोबरपासून एक दिवसीय वर्ल्डकप सामने सुरू होतील. भारतातील प्रमुख शहरांमध्ये हे सामने रंगणार आहेत. दरम्यान, ‘बुक माय शो’ सोबत तिकीट विक्रीचा करार ICC ने केला आहे. मात्र, काही सेकंडरी मार्केटमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट तब्बल 57 लाख रुपयांना मिळत आहे. इतर श्रेणीतील या सामन्यांची अनेक तिकिटे 20 लाखांच्या दरम्यान आहेत.
भारत-पाक सामन्याचे तिकीट
भारत पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठीची सर्व तिकीट अवघ्या काही तासांमध्ये बुक माय शो संकेतस्थळावर विकली गेली. मात्र, Viagogo या संकेतस्थळावर "स्टेडियममधील अप्पर सेक्शन विभागातल्या एका तिकिटाची किंमत तब्बल 57 लाख रुपये इतकी आहे. सहाजिकच हे मैदानातील एक प्रिमियम कॅटेगरीतील सीट असून येथून विना अडथळा सामना पाहता येतो. मात्र, तिकिटाची ऑनलाइन किंमत पाहून अनेकांना चक्कर आली.
भारत-पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी असून हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्स उत्सुक आहेत. भारत-पाक सामन्यांची अनेक तिकिटे 18 आणि 22 लाखांच्या दरम्यान मिळत आहेत. Viagogo ही विविध स्पोर्ट्स सामन्यांचे ऑनलाइन तिकीट विक्री करणारी आघाडीची कंपनी आहे.
Viagogo साइटवरील स्क्रिनशॉट
सोशल मीडियावरून संताप व्यक्त
X (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया माध्यमांवरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बुक माय शो ने तिकिटांची विक्री कशी केली याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, एवढ्या महाग किंमतीचे तिकीट सर्वसामान्य व्यक्ती खरेदी करू शकत नाही. त्यामुळे बुक माय शो या अधिकृत पार्टनरकडून 1 लाख 32 हजार तिकिटांची विक्री कशी करण्यात आली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
इतर सामन्यांसाठीही लाखोंमध्ये तिकीट
भारत-ऑस्ट्रेलियातील सामना चेन्नईतील एम. ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामान्याचे तिकीट 3 लाख रुपयांपर्यंत आहे. तर इंग्लड सोबतच्या सामन्याचे तिकीट 2.35 लाख रुपयांपर्यंत आहे. साऊथ आफ्रिकेसोबचा सामना कोलकात्यातील ईडन गार्डनवर होईल. या सामन्याचे तिकीट सुद्धा 2 लाखांपेक्षा जास्त आहे.