मोबाईलचा वाढता वापर ही समस्या आपल्याला काही नवी नाही. प्रवासात असताना तर हमखास लोक मोबाईल वापरतातच. प्रवास जर लांबचा असेल तर काही लोक संपूर्ण सिनेमा किंवा वेबसिरीज संपवतात. वेळेचा सदुपयोग आणि प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी लोक हा पर्याय निवडताना दिसतात. मात्र तुम्ही विना हेडफोन जर चालू गाडीत, ट्रेनमध्ये किंवा प्लेनमध्ये सिनेमा बघत असाल किंवा जोरोजोरात गाणी ऐकत असाल तर? साहजिकच सहप्रवाशांना याचा त्रास होईल. मोबाईलच्या मोठमोठ्या आवाजाने लोक हमरीतुमरीवर देखील येताना दिसतात. यावर एक उपाय म्हणून BEST बसेस मध्ये फोनवर मोठ्याने बोलल्यास किंवा विनाहेडफोन गाणी-व्हिडीओ पाहिल्यास जर सहप्रवाशांना त्रास होत असेल तर तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
काय आहेत निर्बंध
जर तुम्ही बेस्ट बसमध्ये प्रवास करत असाल आणि तुम्ही वापरत असलेल्या मोबाईलमुळे जर सहप्रवाशांना त्रास होत असेल तर तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणात दोषी आढळल्यास तुम्हांला कलम 38/112 बॉम्बे पोलीस ऍक्ट नुसार 5000 रुपयांचा दंड किंवा 3 महिन्यांची शिक्षा अन्यथा दोन्हीही होऊ शकतात. या संदर्भातील अधिसूचना 25 एप्रिल रोजी BEST कडून जारी करण्यात आली आहे. हे नवे नियम सर्व प्रवाशांना माहिती व्हावेत यासाठी बसमध्ये देखील नियमावली चिटकवली जाणार आहे.
कर्नाटकात लागू आहे हा नियम
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने 2021मध्ये अशा स्वरूपाचा नियम लागू केला आहे. कर्नाटक सरकारच्या बसेसमध्ये प्रवास करताना प्रवाशांना मोबाईल स्पीकर किंवा जोरजोराने गाणी ऐकण्याची अनुमती नाही.
बेस्ट कंपनी ही मुंबईकरांना स्वस्तात सार्वजनिक वाहतुकीची सेवा पुरवणारी कंपनी आहे. बेस्टकडे आजघडीला 3400 पेक्षा सिंगल आणि डबलडेकर बसेस आहेत. यात वातानुकूलित बसेसचा देखील समावेश आहे. दररोज जवळपास 30 लाख मुंबईकर बेस्टने प्रवास करतात.
ध्वनी प्रदूषणाचा त्रास
मुंबईतील प्रचंड गर्दी, वाहतुकीच्या वेगवेगळ्या समस्या मुंबईकरांना नवीन नाहीत. बसमधून प्रवास करताना सर्वांनाच जागा मिळत नाही. अनेक प्रवासी उभे राहूनच प्रवास करतात. कामाचा ताण, प्रवासाची दगदग यांत ध्वनीप्रदूषणामुळे अनेक प्रवाशांना मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागत होते. याबद्दल BEST कडे वारंवार तक्रारी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून हे नियम लागू करण्यात आल्याचे बेस्टचे म्हणणे आहे.
तेव्हा यापुढे जर बस प्रवासात तुम्ही गाणी ऐकण्याचा, सिनेमा बघण्याचा विचार करत असाल तर हेडफोन घेऊनच प्रवास करा. नाही तर बेस्टचा प्रवास तुम्हांला महागात पडू शकतो.