Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

स्विस बॅंकेतील भारतीयांच्या पैशांत 50 टक्क्यांनी वाढ!

Indian Funds in Swiss Bank

स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे साठवणाऱ्या भारतीयांच्या संपत्तीत (Indian Funds in Swiss Bank) एका वर्षात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 14 वर्षांतील ही विक्रमी वाढ असल्याचे म्हटले जात आहे.

स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे साठवणाऱ्या भारतीयांच्या संपत्तीत (Indian Funds in Swiss Bank) एका वर्षात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या संपत्तीची किंमत 3.83 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच भारतीय चलनात सांगायचे झाले तर 30,500 कोटी रूपयांहून अधिक आहे. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने (Switzerland’s National Bank) गुरुवारी दि. 16 जून रोजी जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

भारतीय नागरिक आणि कंपन्यांनी 2021मध्ये स्विस बँकांमध्ये जमा (Indian Money in Swiss Bank) केलेल्या निधीत नुसती वाढ झालेली नाही तर ती गेल्या 14 वर्षांतील विक्रमी वाढ आहे, असे पीटीआयने म्हटले आहे. सलग दुसऱ्या वर्षी ही वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये 2.55 अब्ज स्विस फ्रँक (रु. 20,700 कोटींहून अधिक), तर 2019 मधील 899 दशलक्ष स्विस फ्रँक (रु. 6,625 कोटी) जमा झाले होते.

दरम्यान, स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने सादर केलेली माहिती ही, देशातील विविध बँकांनी मध्यवर्ती बँकेकडे नोंदवलेल्या अधिकृत आकडेवारीचा संग्रह आहे. यात स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या कथित काळ्या पैशाचा हिशेब नाही, असे पीटीआयने म्हटले आहे. त्यात तिसर्‍या देशातील संस्थांच्या नावावर भारतीयांच्या स्विस बँकांमध्ये असलेल्या पैशांचाही समावेश नाही.

स्विस बँकेत ब्रिटन, अमेरिकेन नागरिकांचा पैसा सर्वाधिक

स्विस बॅंकेत ब्रिटनमधील नागरिकांचे 379 अब्ज फ्रॅंक तर अमेरिकन लोकांचे 168 अब्ज फ्रॅंक जमा आहेत. 100 अब्जपेक्षा जास्त पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांमध्ये ब्रिटन आणि अमेरिका या दोन देशांचाच समावेश आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, हॉंगकॉंग, नेदरलॅण्ड, पोलंड, स्वीडन, बांगलादेश, पाकिस्तान या देशांचा क्रमांक लागतो. या क्रमवारीत भारत 44 व्या क्रमांकावर आहे.

स्विस बँक हे नेमकं काय प्रकरण आहे?

स्वित्झर्लंडमधील युबीएस (Union Bank of Switzerland) ही बॅंक जगभरात स्विस बॅंक म्हणून ओळखली जाते आणि ती जगातील पहिल्या तीन बॅंकांपैकी एक बॅंक आहे. स्वित्झर्लंडमध्ये तशा 400 पेक्षा अधिक बँका आहेत. या बँकांमध्ये तिथल्या बँकिंग कायद्याच्या गोपनीयता कायद्यांतर्गत बँक खाते उघडता येऊ शकते. तिथल्या कायद्यानुसार बॅंक ग्राहकाची ओळख जाहीर करणं, हा गुन्हा आहे. म्हणजे इथल्या बॅंकांमध्ये किती पैसे जमा केले, बॅंकेत खातं आहे का? खात्यात पैसे किती आहेत, अशी माहिती दिली जात नाही. यामुळे स्वित्झर्लंडमधील खात्यात बेहिशोबी मालमत्ता जमा होत असल्याचे सांगितले जाते.