एअर इंडियाला (Air India) जगातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तम विमान कंपनी बनवण्यासाठी टाटा समूहाने (Tata Group) आता कंबर कसली आहे. त्यासाठी एअर इंडियाच्या व्यवस्थापनापासून ते परिचालनापर्यंत अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात येत आहेत.
मंगळवारी (14 फेब्रुवारी) टाटा समूहाने (Tata Group) आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान वाहतूक करार केला आहे. हा करार अमेरिकेतील बोईंग (Boeing) आणि फ्रान्सच्या एअरबस (Airbus) या कंपन्यांसोबत झाला असून त्यांच्याकडून 470 नवीन विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. टाटा समूहाच्या एअर इंडियाने (Air India) विमान खरेदीच्या सौद्यावर स्वाक्षरी करून ऐतिहासिक विक्रम रचला आहे. संपूर्ण जगातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
किती विमाने खरेदी केली?
टाटा समूहाने (Tata Group) अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रान्सच्या एअरबस या कंपन्यांकडून 470 विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. यापैकी एअरबसकडून 250 नवीन एअरक्राफ्ट आणि बोईंगकडून 220 मोठी विमाने खरेदी करण्यात येणार आहेत.
एअर इंडिया एअरबसमधून 40 मोठ्या आकारांची एअरबस ए 350 आणि 10 बोईंग 777-9 या विमानांची खरेदी करण्यात येईल. याशिवाय 210 छोट्या आकाराची एअरबस ए 320/321 निओ आणि 190 बोईंग 737 मॅक्स विमान खरेदी केली जातील. या दरम्यान एअर इंडियाने पहिल्याच टप्प्यात 11 बी 777 आणि 25 ए 320 विमान घ्यायला सुरुवात केली आहे.
व्यवहार किती रुपयांचा झाला?
एअर इंडिया 34 अब्ज डॉलर्समध्ये 220 विमाने खरेदी करणार आहे. यामध्ये 190 B737 Max, 20 B787 आणि 10 B777X यांचा समावेश आहे. करारानुसार आणखी 70 विमाने खरेदी करण्याचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. यामुळे एकूण व्यवहार मूल्य 45.9 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहचेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
महत्त्वाचं म्हणजे बोईंग आणि एअरबसचं डील 80 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
जगाने या डीलची का घेतली दखल?
संपूर्ण जगातून एअर इंडियाचं कौतुक केलं जातंय. टाटा समूहाच्या या डिलचा फायदा 4 देशांना होणार आहे. या चार देशांमध्ये फ्रान्स, अमेरिका, इंग्लड आणि भारताचा समावेश असणार आहे. या डिलनुसार विमानं बनवण्याची जवाबदारी अमेरिका आणि फ्रान्सची असेल. याशिवाय विमानाचं इंजिन इंग्लडमध्ये तयार करण्यात येणार आहे. भारतात ही विमानं येणार असल्याने मध्यमवर्गाची हवाई वाहतूक अधिक सोपी, सुलभ आणि परवडणारी होईल असंही मत व्यक्त केलं जातंय.
अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन (US President Biden) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) फोनवरील संभाषणानुसार, एअर इंडिया-बोईंग यांच्यातील ऐतिहासिक करारामुळे अमेरिकेतील 44 राज्यांमध्ये 10 लाख रोजगार निर्माण होतील असं बिडेन यांचं मत आहे. एअर इंडिया-बोईंग कराराची घोषणा करताना बिडेन म्हणाले की, पंतप्रधान मोदींसोबत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते उत्सुक आहेत.
एअर इंडियाच्या या करारानंतर ऋषी सुनक (Rushi Sunak) यांनी ट्विट करत म्हटलं की, हा भारताच्या दशकातील सर्वात मोठा निर्यात करार आहे. याचा फायदा यूकेच्या एरोस्पेस क्षेत्राला होणार आहे. साहजिकच या करारामुळे रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काय म्हणाले?
एअर इंडिया आणि एअरबस (Airbus) यांच्यामध्ये झालेल्या विमानांच्या कराराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही कंपन्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘या ऐतिहासिक करारासाठी मी एअर इंडिया-एअरबसचे अभिनंदन करत आहे.’
पुढे ते म्हणाले की, भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राला पुढील 15 वर्षांत 2000 हून अधिक विमानांची आवश्यकता असेल. भारत विमान वाहतूक क्षेत्रासाठी देखभाल आणि दुरुस्ती केंद्र बनू शकतो.टाटा समूहाने खरेदी केलेल्या विमानांमध्ये 140 A320 विमाने, 70 A321 निओ विमाने आणि एअरबसची 40 A350 विमाने आहेत, ज्याचा फायदा भारताच्या हवाई वाहतूकीला होणार आहे.
यापूर्वी अशा स्वरूपाची विमान खरेदी झाली आहे का?
एअर इंडियाने 2005 साली शेवटची विमान खरेदी केली होती. त्यावेळी 111 विमानांची खरेदी करण्यात आली होती, ज्यामध्ये 68 बोइंग विमान आणि 43 एअरबसचा समावेश करण्यात आला होता.
याशिवाय 2021 साली युनायटेड एअरलाईन्सने (United Airlines) 270 विमानांची खरेदी केली होती.यातील 200 विमानं ही बोईंगकडून खरेदी केली होती, तर उर्वरित 70 विमानं ही एअरबसकडून खरेदी करण्यात आली होती. हा व्यवहार साधारण 35 अब्ज डॉलर पर्यंत गेला होता. तसंच सप्टेंबर 2016 रोजी भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल विमाने खरेदी करण्याचा अंतिम करार झाला होता. या विमानांची किंमत 7.87 अब्ज युरो ठेवण्यात आली होती.