पर्सनल कॉम्प्युटर (Personal Computer) म्हणजेच पीसी. भारतासाठी जेव्हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र नवखं होतं तेव्हा प्रत्येक मध्यमवर्गीय भारतीयाची इच्छा असायची की आपल्या घरातही एक कॉम्पुटर असावा. परंतु जसजसे आयटी क्षेत्र विस्तारत गेले, स्मार्टफोनचा वापर वाढत गेला आणि त्यातही स्पर्धा वाढत गेल्या हळूहळू पर्सनल कॉम्प्युटर घेणे लोक टाळू लागले आहेत.
मार्केट रिसर्च फर्म इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (International Data Corporation) एका अहवालानुसार जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारतीय बाजारपेठांमध्ये पर्सनल कॉम्पुटरच्या विक्रीत 30% घसरण झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत भारतात 42.82 लाख पीसीचे युनिट विकले गेले होते. यावर्षी मात्र विक्रीत 30% घट होऊन केवळ 29.92 लाख पीसी युनिट विकले गेले आहेत.
इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन जगभरातील संगणक उपकरणांचा त्रैमासिक अहवाल सादर करत असते. डेस्कटॉप, नोटबुक आणि वर्कस्टेशन हे संगणक पर्सनल कॉम्पुटर या वर्गवारीत येतात. गेल्या काही वर्षांपासून या सर्व प्रकारच्या संगणकाच्या विक्रीत वाढ मंदावलेली दिसते आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी खरेदीसाठी असलेल्या संगणकांना पहिल्यासारखी मागणी नसल्याचे देखील अहवालात म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून संगणकाच्या विक्रीत होत असलेली घट नेमकी कशामुळे होते आहे यावर अनेक जाणकारांनी आपले म्हणणे मांडले आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:
मोबाईलचा वापर
स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि किंमतीच्या बाबतीतही परवडण्याजोगे असल्यामुळे, भारतातील अनेक लोक त्यांच्या कॉम्पुटरच्या गरजा भागवण्यासाठी मोबाईल किंवा टॅब्लेटसारख्या पोर्टेबल डिव्हाइसेसची निवड करताना दिसतायेत.
इंटरनेट कनेक्शन
हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन्स आणि परवडणारे मोबाइल डेटा प्लॅन्स यामुळे देखील सामान्य नागरिक स्मार्टफोन आणि टॅब्लेटचा वापर करू लागले आहेत. पर्सनल कॉम्पुटरसाठी इंटरनेट सुविधा घेण्यासाठी अनेकदा वेगळे ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावे लागते, त्याचा खर्च देखील अधिक असतो. त्यामुळे देखील पर्सनल कॉम्पुटर घेणे लोक टाळत आहेत.
लॅपटॉपची वाढती लोकप्रियता
लॅपटॉप पोर्टेबिलिटी आणि कार्यक्षमता याबद्दल आपण सर्वच जाणतो. मोबाइल फोनच्या तुलनेत लॅपटॉप मोठा स्क्रीन आकार आणि कीबोर्ड सुविधा देतो. सध्या लॅपटॉप निर्मितीत आणि विक्रीत होत असलेली स्पर्धा सामान्य नागरिकांच्या पथ्यावर पडलेली दिसते आहे. गेल्या काही वर्षात लॅपटॉपच्या किमती कमालीच्या घटल्या असून तरुणवर्ग देखील लॅपटॉपला पसंती देत आहे.