Pune Bypoll Elections: पुणे शहरामध्ये पोटनिवडणुकीची जय्यत तयारी सुरू असतानाच कसबा पेठ इथून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोटनिवडणुकीपूर्वी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) तैनात केलेल्या विशेष गस्त पथकांनी कसबा पेठ परिसरातून सुमारे ₹ 10.53 लाख रुपये रोख आणि 231 लिटरपेक्षा जास्त दारू जप्त केली आहे. अशी माहिती कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या पोलिस आणि इतर भरारी पथकांनी गुरुवारपर्यंत 10,668 वाहने रोखून त्याची तपासणी केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात आचारसंहितेचे पालन व्हावे आणि व्यवस्थितरित्या निवडणूक पार पाडावी यासाठी,निवडणूक आयोगाने नऊ पोलीस चौक्या आणि नऊ भरारी पथके तैनात केली आहेत.कसबा आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक 26 फेब्रुवारीला होणार असून, 2 मार्च 2023 रोजी मतमोजणी होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील चिंचवड (Chinchwad Bypoll Election)आणि कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ‘ड्राय डे ‘ घोषित करण्यात आला आहे. या दिवसात किरकोळ मद्यविक्रीला बंदी असणार आहे. तसेच मतदानाच्या दिवशी 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या 2 मार्च 2023 रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत हा नियम संपूर्ण मतदारसंघात लागू असणार आहे. निवडणुका खुल्या वातावरणात आणि कुठलाही गैरव्यवहार न करता पार पाडाव्यात यासाठी प्रशासन खबरदारी घेत असते. मतदारसंघातील किरकोळ मद्यविक्री बदं ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
तक्रारीसाठी निवडणूक आयोगाचे खास ऍप
कसबा आणि चिंचवडच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेमुळे अवैध बाबींवर तक्रार करणे सामान्य नागरिकांसाठी सोपे होणार आहे. सदर ऍप मोफत असून प्ले स्टोअरवरून हे ऍप डाऊनलोड करता येणार आहे. लोकशाहीचे रक्षक म्हणून सामान्य नागरिक निवडणूक संबंधी तक्रार या ऍपवर नोंदवू शकतात. तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाते.