मे महिन्यापासून विमान कंपन्या सातत्याने विमान प्रवासभाडे वाढवत असल्याच्या तक्रारी येत होत्या. नागरिकांच्या या तक्रारीची दखल थेट संसदेत घेतली गेली होती. मात्र आशाही परिस्थितीत नागरिकांनी विमान प्रवास करणे सोडलेले नाहीये. होय, भारतात विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये भारतातील विमान प्रवाशांच्या संख्येत 22.81 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.
विमानाने प्रवास करणारे प्रवाशी भाववाढीची तक्रार करत असताना, विमान प्रवासाला विकल्प शोधत नाहीयेत असे दिसते आहे. 14 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात देशभरात 1.24 कोटी प्रवाशांनी देशांतर्गत विमानाने प्रवास केला. गेल्या वर्षी म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये ही आकडेवारी 1.01 कोटी इतकी नोंदवली गेली होती. म्हणजेच यंदा 23 लाख प्रवाशांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
सर्वाधिक पसंती कोणत्या कंपनीला?
मे 2023 महिन्यात ‘गो फर्स्ट’ (Go First Crisis) ही विमान कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांनी भाडेवाढ केली होती. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात प्रवाशांना महागड्या विमान तिकिटांची झळ सहन करावी लागत होती. त्यानंतरही सातत्याने अनेक मार्गावर विमान प्रवासभाडे वाढतानाच दिसत आहे.
अशात देशांतर्गत विमान सेवा देणाऱ्या ‘इंडिगो’ (Indigo Airlines) या विमान कंपनीनला प्रवाशांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत इंडिगोद्वारे एकूण 78.67 लाख प्रवाशांनी यात्रा केली. यानुसार विमान कंपनीचा एकूण बाजारातील हिस्सा 63.3 टक्के इतका नोंदवला गेला आहे.
विस्तारा आणि स्पाईसजेटही स्पर्धेत
टाटा उद्योगसमूह आणि सिंगापूर एयरलाईन्सचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘विस्तारा’ (Vistara Airlines) या विमान कंपनीला देखील प्रवाशांनी पसंती दर्शवली आहे. ऑगस्ट महिन्यात ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. 12.17 लाख प्रवाशांनी ऑगस्ट महिन्यात विस्तारा एयरलाईन्सने प्रवास केला. या कंपनीची बाजारातील हिस्सेदारी 9.8% नोंदवण्यात आली आहे.
याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर ‘स्पाईसजेट’ (SpiceJet) ही कंपनी असून या कंपनीचा बाजारातील हिस्सा 4.4% इतका नोंदवण्यात आला आहे.