एकीकडे तूर डाळीचे भाव देशभरात गगनाला भिडलेले असताना तूर डाळीच्या बाबतीत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गोवा सरकारने कोविड-19 महामारीच्या काळात लोकांना वितरित केल्या जाणार्या तूर डाळ खरेदीवर 1.91 कोटी रुपयांचा केलेला खर्च वाया गेला आहे.
होय वाया गेलाय हा खर्च! याचे कारण म्हणजे देशभरात कोविड-19 महामारीची साथ असताना राज्यातील नागरिकांना अन्न धान्यांचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी गोवा सरकारच्या अन्न व पुरवठा मंत्रालयाने सुमारे 1.91 कोटी रुपयांची, 400 मेट्रिक टन (MT) तूर डाळ खुल्या बाजारातून खरेदी केली होती. मात्र ही खरेदी गरजेपेक्षा जास्त होती.
काय झाले 1.91 कोटी रुपयांच्या डाळीचे?
खरे तर गोवा सरकारने खरेदी केलेली 1.91 कोटी रुपयांची तूर डाळ खराब झाली असून ती गाईगुरांना देखील खाण्यास योग्य नसल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) चा 2021 चा अहवाल गुरुवारी राज्य विधानसभेत मांडण्यात आला, त्यात हा खुलासा करण्यात आला आहे. 2021 सालात, म्हणजे दोन वर्षांपूर्वी देशात कोरोनाचे संकट आले असताना, राज्यातील सामान्य नागरिकांना पुरेसा पुरवठा करण्यासाठी सरकारने ही तूर डाळीची खरेदी केली होती. मात्र सरकारचे नियोजन चुकल्यामुळे ही अतिरिक्त तूर डाळ गोदामात पडून खराब झाली आणि शेवटी ती फेकून द्यावी लागली. माणसेच नाही तर जनावरांना देखील खाण्यायोग्य ही डाळ नव्हती.
400 मेट्रिक टन (MT) पैकी जवळपास 240 मेट्रिक टन (MT) तूर डाळीचे वितरण सरकारला शक्य झाले नाही आणि ही डाळ खराब झाली.कॅगच्या म्हणण्यानुसार, राज्यात तूर डाळ जास्त खरेदी केल्यामुळे राज्य नागरी पुरवठा विभागाचे 1.91 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
नियोजनाचा अभाव
CAG चा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर अन्न व पुरवठा मंत्रालयाने नियोजन न करता अन्नधान्यांची खरेदी केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात अन्नधान्यांची नासाडी होत असताना सरकारने त्याकडे विशेष लक्ष दिले असते आणि गरजूंना शिधा वाटप केला असता तर अन्नाची आणि पैशाची नासाडी झाली नसती अशा भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.