शहरातील स्वच्छतेमध्ये सुधारणा व्हावी यासाठी Municipal Corporation कडून विविध प्रकारे प्रयत्न केले जातात. या प्रयत्नात नागरिकांच्या सहकार्याची गरज असते. काही वेळा नागरिकांचे सहकार्य मिळते तर काही वेळा ते मिळत नाही. यावर 1000 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय ठाणे पालिकेकडून घेण्यात आला आहे.
ठाणे या शहरात याआधीदेखील दंड करण्यात आलेला आहे. मात्र आता या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे.. उघड्यावर कचरा टाकणे, उघड्यावर लघुशंका / शौच करणे, थुंकणे, पाळीव प्राण्याद्वारे अस्वच्छता याविषयी याआधी दंड लावण्यात आले होते. मात्र आता ठाणे शहरातील स्वच्छता मोहिम अधिक कार्यक्षमतेने हाती घेण्यात आली आहे. आणि यामुळेच दंडाच्या रकमेत सुधारणा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे. आता 500 रुपये आणि 1 हजार रुपये इतकी दंडाची रक्कम करण्यात आली आहे.
पूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये नियमित स्वच्छता करण्यात येत आहे. ही मोहिम व्यापक स्वरुपात सुरू राहणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
म्हणून दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा घेतला निर्णय
याअंतर्गत शहरे हागणदारी मुक्त करणे, शहराची साफसफाई करणे, कचरा संकलन वाहतूक व त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येऊन शहर स्वच्छतेचे काम केले जात आहे. घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2016 अंतर्गत जे व्यक्ति किवा संस्था याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे. यापूर्वी दंड लावून देखील तो कमी असल्याने त्याबाबत गांभीर्य दिसून येत नसल्याने दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
असा असेल दंड
रस्ते तसेच मार्गावर घाण करणे किवा कचरा फेकणे यासाठी सध्याचा दंड 180 रु. तर सुधारित दंडाची रक्कम 500 रु. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यासाठी सध्याची दंडाची 150 रु. तर सुधारित दंडाची रक्कम 500 रुपये, उघडयावर लघुशंका करणे यासाठी सध्याचा दंड 200 रुपये तर सुधारित दंडाची रक्कम 1 हजार रुपये, उघडयावर शौच करणे यासाठी सध्याची दंडाची रक्कम 500 रु. तर सुधारित दंडाची रक्कम 1 हजार रुपये, पाळीव प्राण्यांद्वारे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे यासाठी सध्याची दंडाची रक्कम 180 रुपये, सुधारित दंडाची रक्कम 1 हजार रुपये असा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.