Logistics jobs: मालवाहतूक आणि एकंदर लॉजिस्टिक क्षेत्र तेजीत असल्याने पुढील चार वर्षांत 1 कोटी नोकऱ्या तयार होतील, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. बाजारपेठेतील वाढलेली उलाढाल, निर्मिती उद्योगांसाठीचे सकारात्मक सरकारी धोरणे, वस्तुंचा वाढता खप यामुळे अनेक नव्या नोकरीच्या संधी तयार होतील, असे अभ्यासात म्हटले आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्र मंदीत सापडल्याने नोकरभरती थंडावली आहे. मात्र, लॉजिस्टिक क्षेत्रातील चित्र पुढील काळात सकारात्मक दिसत आहे.
थर्ड पार्टी लॉजिस्टिक कंपन्यांमध्ये वाढ
थर्ड पार्टी लॉजिस्टिक पुरवठा करणाऱ्या अनेक नव्या कंपन्या मार्केटमध्ये येत आहेत. या कंपन्यांद्वारे मालाची वाहतूक, साठवणूक आणि इतर संबंधित कामे करण्यात येत आहेत. या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी वाढतील. तसेच ग्रामीण भागातही वाहतूक सेवांची मागणी वाढत असल्याचे टीमलीज कंपनीने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
मालवाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्र वार्षिक 12% दराने वाढत आहे. टीम लीज कंपनीने लॉजिस्टिक क्षेत्राचा अभ्यास इंडस्ट्री रिपोर्ट आणि मार्केट रिसर्चच्या आधारे केला आहे. देशातील वस्तुंचे उत्पादन आणि वापर दोन्ही वाढत आहेत. त्यामुळे मालाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना आणखी मागणी येईल. या क्षेत्रात 1 कोटी अतिरिक्त मनुष्यबळ लागेल, असे कंपनीचे प्रमुख बालसुब्रह्मण्यम यांनी म्हटले.
निर्मिती क्षेत्रातील कंपन्या आणि उत्पादन वाढल्याने वितरण, पुरवठा, गोदामे, वाहतूक सेवांचा विस्तार झाला आहे. नागरिकांचे उत्पन्न वाढत आहे. ग्रामीण आणि शहरी भागात वस्तुंची मागणी वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.
कोणत्या जॉबच्या संधी निर्माण होतील?
सप्लाय चेन मॅनेजर, लॉजिस्टिक स्पेशालिस्ट, डिस्ट्रिब्युशन मॅनेजर्स, वेअरहाऊसिंग मॅनेजर्स अशा पदांसह असिस्टंट, सपोर्ट स्टाफची मागणी वाढेल. बाजारातील मागणी आणि पुरवठा याचा अंदाज बांधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे लॉजिस्टिक टेक संबंधीत नोकऱ्यांची दारेही खुली होतील.