कोरोना लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन बैठकांकरिता लोकप्रिय झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूममध्ये 15% कर्मचारी कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजेच कोणतेही कारण न देता अध्यक्षां कामावरुन तडकाफडकी काढून टाकण्यात आल्याने अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे. गेल्याच महिन्यात झूमने 1300 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. (Zoom that laid off 1,300 employees last month now sacked its president without any cause)
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मंदीचा प्रभाव वाढत चालला आहे. खर्च कपात आणि काटकसरीच्या निमित्ताने बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचे लोण पसरले आहे. फेसबुक, मेटा, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांप्रमाणेच झूम कंपनीने देखील आतापर्यंत 1300 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. झूमने एकूण मनुष्यबळापैकी 15% कर्मचारी कमी केले आहेत. याशिवाय वरिष्ठ व्यवस्थापनातील अनेक पदाधिकाऱ्यांची गच्छंती करण्यात आल्याचे बीबीसीने म्हटले आहे. कोरोना लॉकडाउनकाळात झूमच्या व्हिडिओ कॉन्फरन्स सेवेला प्रचंड मागणी होती. दोन वर्षात कंपनीला चांगला महसूल मिळाला होता. कंपनीने मनुष्यबळ तीनपटीने वाढवले होते.
झूमने केलेल्या नोकर कपातीमध्ये कंपनीचे अध्यक्ष ग्रेग टॉम्ब यांचाही नंबर लागला आहे. टॉम्ब यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन काढण्यात आले आहे. जून 2022 मध्ये ग्रेग टॉम्ब यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झूमच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. झूम जॉईन करण्यापूर्वी गुगल. एसएपी या बड्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले होते.
झूममध्ये कर्मचारी कपात करण्यात आली असली तरी कंपनीचा रुटीन बिझनेस सुरुच राहणार आहे. त्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे झूमचे सीईओ एरिक युआन यांनी म्हटले आहे. कोरोना संकटातून जग सावरले आहे.
कंपनीच्या सीईओंचा भावनिक ई-मेल
इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारी कपात केल्यानंतर झूमचे सीईओ एरिक युआन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहलेल्या ई-मेलमध्ये या प्रकाराबाबत स्वत: जबाबदार असल्याचे म्हटले आहे. झूममधील कर्मचारी कपात म्हणजे एक मोठी चूक असून त्याची शिक्षा म्हणून येत्या वर्षातील त्यांच्या वेतनात 98% कपात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याशिवाय कॉर्पोरेट बोनसवर देखील पाणी सोडणार असल्याचे त्यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे.
फेब्रुवारी महिन्यात 22800 कर्मचारी बेरोजगार
महागाई वाढल्याने खर्च आटोक्यात आणण्यासाठी वर्ष 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत अनेक बड्या कंपन्यांनी नोकर कपातीचा मार्ग स्वीकारला. ज्यात हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली. मात्र त्याहून भीषण परिस्थिती 2023 मध्ये निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध, युरोप आणि अमेरिकेत उसळलेला महागाईचा आगडोंब यामुळे जगभरात मंदीसदृश्य परिस्थिती आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात जगभरातील 268 कंपन्यांनी 84400 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. कोव्हीड संकटकाळापेक्षा ही परिस्थिती भयंकर आहे. केवळ फेब्रुवारी महिन्यात 22800 कर्मचारी बेरोजगार झाले. झूम, गुगल, मायक्रोसॉफ्ट, लिंकडेन, एचपी, टिकटॉक, याहू, डेल यासारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचारी कमी करुन खर्चात काटकसर करण्याचा प्रयत्न केला.