काही दिवसांपूर्वी स्वीगीने (Swiggy) त्यांच्या प्लॅटफाॅर्मवर शुल्क आकारण्यास सुरूवात केली होती. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत झोमॅटोनेही शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ग्राहकाने ऑर्डर केल्यावर बिलाच्या रकमेत 2 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. तसेच, Zomato Gold वापरणाऱ्या युझर्सलासुद्धा हा शुल्क द्यावा लागू शकतो. हा शुल्क सध्या निवडक युझर्ससाठीच आहे. ब्लिंकिट व झोमॅटोच्या क्विक-काॅमर्सवर अजून हे शुल्क लागू केले नाहीत.
कंपनीचा हा आहे प्लॅन
मार्केटमधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कंपनीला त्यांच्या शेअर धारकांना नफा दाखवणे आवश्यक आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कुठून तरी पैसे येतील. ते रेस्टाॅरंटकडून ही अपेक्षा करू शकत नाहीत, असे केल्यास ते बंड करतील. तसेच, युझर्सच्या बिलात छोटी वाढ त्यांच्या लक्षात येणार नाही. पण, त्यातून कंपनीला खूप नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनी प्लॅटफाॅर्मवर शुल्क वाढवून नफा मिळवण्याच्या तयारीत असल्याची दिसून येत आहे. जर कंपनीला यातून नफा मिळाला तर कंपनी हा शुल्क सर्वत्र सुरू करू शकते.
युझर्सला बसणार झळ
अॅपमध्ये बिलिंगच्या विभागात एका पाॅप-अपवर झोमॅटोने म्हटले आहे की, हे छोटे शुल्क आहे, जे आम्हाला बिल पे करायला मदत करते ज्यामुळे, आम्ही Zomato सुरू ठेवू शकतो. त्यामुळे झोमॅटो येत्या काही दिवसात हा शुल्क सर्वत्र सुरू करण्याची शक्यता आहे. कंपनीने हे पाऊल उचलल्यास युझरला प्रत्येक ऑर्डर मागे 2 रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे युझर्सला याची झळ बसण्याची शक्यता आहे तर कंपनीला याद्वारे जास्त नफा मिळू शकतो. तसेच, कंपनीच्या प्रवक्त्याने मनी कंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सध्या टेस्टच्या पहिल्या टप्प्यात आहे, त्यामुळे पुढे हे सुरू राहिल की नाही, आता याविषयी काहीच स्पष्ट नाही. त्यामुळे टेस्टच्या परिणामांवर कंपनी पुढचे पाऊल उचलणार असल्याचे दिसत आहे.
कंपनीची वाटचाल जोरात
रेस्टाॅरंट झोमॅटो आणि स्वीगीसारख्या कंपन्यांना एका ऑर्डरवर 22-28 टक्के कमिशन देते. तर जेपी माॅर्गनच्या एका नोटनुसार झोमॅटोने जूनच्या तिमाहीमध्ये जवळपास 17.6 कोटीच्या ऑर्डर दिल्या आहेत. म्हणजेच एका दिवसात 20 लाख ऑर्डर कंपनीने दिल्या आहेत. तसेच, कंपनीने जूनच्या तिमाहीत 2 कोटीचा नफा झाला असल्याचे ही जाहीर केले आहे. पण, मागच्या वर्षी याच तिमाहीत त्यांना 186 कोटीचा तोटा झाला होता. आता कंपनीचे सर्व आलेख सुधारले असून ही कंपनीसाठी आणि तिच्या शेअर धारकांसाठी चांगला वेळ सुरू झाला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.