• 24 Sep, 2023 01:59

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Zerodha Passive Funds: झिरोधाची म्युच्युअल फंड व्यवसायात उडी; 'या' दोन नव्या योजना लवकरच येणार

Zerodha amc new passive funds

Image Source : www.fortuneindia.com/www.adigitalblogger.com

झिरोधा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या दोन पॅसिव्ह फंड योजना लवकरच येणार आहेत. म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच कंपनीकडून योजना लाँच करण्यात येत आहेत. कोणत्या दोन योजना आहेत जाणून घ्या?

Zerodha AMC funds: स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात यश मिळवल्यानंतर निखिल कामत यांच्या झिरोधाने म्युच्युअल फंड व्यवसायात उडी घेतली आहे. मागील महिन्यात झिरोधा अॅसेट मॅनेजमेंट (Zerodha AMC) कंपनी स्थापन करण्यास सेबीची परवानगी मिळाली. त्यानंतर आता दोन पॅसिव्ह फंड योजना सुरू करण्यास झिरोधा AMC सज्ज झाली आहे.

गुंतवणुकदारांना लवकरच या योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. दोन पॅसिव्ह फंड सुरू करण्यासाठी झिरोधाने सेबीकडे ड्राफ्ट पेपर जमा केला आहे. सेबीची परवानगी मिळाल्यानंतर फंड गुंतवणुकीसाठी खुला होईल. 

झिरोधाचे पॅसिव्ह फंड कोणते?

झिरोधा टॅक्स सेव्हर (ELSS) इंडेक्स फंड आणि  झिरोधा निफ्टी लार्ज मिडकॅप 250 इंडेक्स फंड, असे या दोन योजनांची नावे आहेत. हे दोन्ही पॅसिव्ह फंड असून निफ्टी लार्ज मिडकॅप 250 इंडेक्सवर आधारित आहेत. 

आयकरातून वजावट मिळवण्यासाठी झिरोधा टॅक्स सेव्हर

झिरोधा टॅक्स सेव्हर योजनेद्वारे गुंतवणुकदारांना आयकर कायद्यातील 80C नुसार कर वजावट मिळवता येईल. टॅक्स सेव्हर योजनेला 3 वर्षांचा लॉक-इन पिरियड असून ही एक ओपन एंडेड योजना आहे. (Zerodha AMC passive funds)  लॉक-इन पिरियड म्हणजे ठराविक कालावधीपर्यंत (3 वर्ष) योजनेतून पैसे काढून घेता येणार नाहीत. याजनेतील 95% टक्के निधी इक्विटीमध्ये गुंतवण्यात येईल. 

तर झिरोधा निफ्टी लार्ज मिडकॅप 250 इंडेक्स फंड या दुसऱ्या योजनेद्वारे इक्विटी आणि इक्विटी संबंधीत पर्याय जसे की, डेट, मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करता येईल. ही सुद्धा ओपन एंडेड फंड योजना आहे. 

पॅसिव्ह फंड म्हणजे काय?

पॅसिव्ह फंड योजना भांडवली बाजारातील निफ्टी आणि सेन्सेक्ससारख्या प्रमुख इंडेक्सला फॉलो करतात. म्हणजेच कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल अभ्यास केला जात नाही. जी कंपनी इंडेक्समध्ये असेल त्या कंपनीत गुंतवणूक करण्यात येते. उदा. निप्टी-50 इंडेक्समध्ये स्थान मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये फंड हाऊसकडून गुंतवणूक केली जाईल. या योजनांचा एक्सपेन्स रेशो (खर्चाचे प्रमाण) अॅक्टिव्ह योजनांपेक्षा कमी असतो.   

ऑगस्ट महिन्यात निखिल कामत यांच्या झिरोधाला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना मिळाला. स्मॉलकेस या कंपनीसोबत भागीदारी करत या नव्या व्यवसायाचा शुभारंभ करण्यात आला. स्मॉलकेस आणि झिरोधा जॉइंट व्हेंचरद्वारे एकत्र आले आहेत. 

कंपनीचे सीईओ कोण?

झिरोधा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ म्हणून विशाल जैन काम पाहणार आहेत. यापूर्वी त्यांनी निप्पॉन इंडिया AMC मध्ये काम केले आहे. येत्या काळात झिरोधा AMC आणखीनही योजना घेऊन येण्याच्या तयारीत आहे.