• 02 Oct, 2022 09:13

YouTube University: नवनवीन कौशल्य शिकवणारी युट्यूब चॅनेल्स!

YouTube University: नवनवीन कौशल्य शिकवणारी युट्यूब चॅनेल्स!

YouTube Free University : YouTubeच्या प्लॅटफॉर्मवर जगभरात असंख्य युझर्स आहेत. जगभरात युट्यूबचा वापर वेगवेगळी कौशल्य शिकण्याठी आणि आपली कला सादर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जात आहे. आज आपण अशाच काही शैक्षणिक युट्यूब चॅनेल आणि युट्यूबर्सची माहिती घेणार आहोत.

YouTube Free University : YouTubeच्या प्लॅटफॉर्मवर जगभरात असंख्य युझर्स आहेत. आज जगभरात युट्यूबचा (YouTube) वापर वेगवेगळी कौशल्य शिकण्यासाठी आणि इतरांना शिकवण्यासाठी केला जात आहे. युट्यूबच्या माध्यमातून अनेकांनी मोठी झेप घेतली आहे. यात स्वत:चे युट्यूब चॅनेल चालवणारे युट्यूबर्स तर आहेत. पण त्याचबरोबर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. कारण त्यांना या चॅनेलद्वारे काही गोष्टी शिकून स्वत: मोठं व्हायचे आहे. तर आज आपण अशाच काही युट्यूबर्सची माहिती घेणार आहोत.

सीए रचना रानडे (CA Rachana Phadke Ranade)

सीए रचना रानडे हिचा स्वत:च्याच नावाने युट्यूब चॅनेल आहे. ती स्वत: चार्टर्ड अकाउंटंट (CA) असून तिने बॅचलर इन कॉमर्स (बीकॉम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM) आणि मास्टर इन बिझनेस स्टडीज (MBS)चे शिक्षण घेतले आहे. रचनाने तिच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना फायनान्समधील विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

क्रेझी जीकेट्रीक (Crazy GkTrick)

सरकारी नोकरीसाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान (General Knowledge) चांगले असणे आवश्यक आहे. जवळजवळ सर्व महत्त्वाच्या सरकारी परीक्षांमध्ये जनरल नॉलेजचा (GK) एक भाग असतो. GK अंतर्गत येणारी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं सोपं नाही. यासाठी काही टीप्स आणि युक्त्या आवश्यक आहेत. यासाठी Crazy GkTrick हे एक चांगले YouTube चॅनेल आहे. जे सामान्य ज्ञान कसं वाढवाव याचं मार्गदर्शन व्हिडिओद्वारे करत आहे.

लेट्स टॉक (Let’s Talk)

भारतीयांसाठी इंग्रजीमधून बोलणे हा करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा भाग मानला जातो. इंग्रजी भाषा ही जागतिक स्तरावरील लोकांना जोडण्याचे साधन म्हणून काम करते. जागतिक पातळीवरील विविध प्रकारच्या संधी मिळविण्यासाठी पुरेसं इंग्रजी बोलण्याचं कौशल्य असणं गरजेचं आहे. Let’s Talk हे युट्यूब चॅनेल लोकांना सहजतेने इंग्रजी शिकण्यासाठी मदत करते. ते त्यांच्या चॅनेलवर इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर नियमित व्हिडिओ शेअर करतात. या व्हिडिओच्या माध्यमातून कोणीही प्रभावीपणे इंग्रजी भाषा बोलण्यास शिकू शकतो.

मॅग्नेट ब्रेन्स (Magnet Brains)

Magnet Brains हे एक ऑनलाईन शिक्षण देणारं प्लॅटफॉर्म आहे; जे केजी पासून 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासक्रम देत आहेत. हे यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांना विषय सहजपणे समजून घेण्यास आणि CBSE/NCERT, IIT/JEE/NEET, UPSC/SSC परीक्षांमध्ये  चांगले मार्गदर्शक ठरू शकते. 2016 मध्ये या चॅनलची सुरूवात झाली असून चॅनेलवर 7.28 दशलक्षाहून अधिक सक्रिय सदस्य आहेत.

अनअकॅडमी (Unacademy)

Unacademy हे ऑनलाईन शिक्षणासाठी दर्जेदार व्यासपीठ आहे. अनअकॅडमीने ऑनलाईन शिक्षणासोबत युट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल आणले आहे. यातून ते विद्यार्थ्यांची विविध विषयांवरील तयारी करून घेतात. Unacademy ने JEE, UPSC आणि बँकिंग सारख्या विशिष्ट परीक्षांसाठी वेगवेगळे YouTube चॅनेल सुरू केले आहेत.

मिस्टर इंडियन हॅकर (Mr. Indian Hacker)

मिस्टर इंडियन हॅकर हा नेहमीच्या वा मुख्य प्रवाहातील शैक्षणिक चॅनेल नाही. पण इथे विज्ञान आणि विविध प्रयोगावर आधारित वेगवेगळे उपक्रम केले जातात. हे प्रयोग करताना त्यामागील सायन्टिफिक कारणं, तसेच त्याचा होणार परिणाम याबाबत मार्गदर्शन केले जाते. काही गोष्टींचे प्रयोग आपल्याला घरी करता येत नाहीत. अशावेळी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्याचे परिणाम समजून घेऊ शकतो. 

नेसो अकादमी (Neso Academy)

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नेसो अकॅडमी हे चॅनल खूपच उपयोगी ठरू शकतं. इथे तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, डेटा स्ट्रक्चर्स आणि थिअरी ऑफ कंप्युटेशन यासह काही महत्त्वाच्या विषयांबद्दलच्या संकल्पना समजून घेता येतील. इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही संकल्पना समजून घेणं अवघड वाटत असेल तर या युट्यूब चॅनेलची तुम्हाला मदत होऊ शकेल.

प्रांजल कामरा (Pranjal Kamara)

शाळा-कॉलेजांमधून मिळणाऱ्या शैक्षणिक शिक्षणाइतकेच आर्थिक शिक्षण ही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण शिक्षण संपल्यानंतर प्रत्यक्ष पैशांचा संबंध येतो. अशावेळी योग्य आणि खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनेलचा चांगला उपयोग होऊ शकतो. इथे तुम्हाला पर्सनल फायनान्स सोबतच शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक याबद्दलची इत्यंभूत माहिती मिळेल.

तर, YouTube या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर असे अनेक भारतीय आहेत. जे वेगवेगळ्या विषयांवरील माहिती मोफत शेअर करत आहेत. त्यांचे अनुभव सांगत आहेत. यातून इतरांना शिकण्याची आणि नवीन कौशल्यं आत्मसाद करण्याची प्रेरणा मिळत आहे.