येस बॅंकेने एमसीएलआर (MCLR-Marginal cost of funds based lending rate) रेटमध्ये 10 ते 15 बेस पॉईंटने वाढ केली. त्यामुळे येस बॅंकेच्या सर्व प्रकारच्या कर्जात 0.15 टक्क्यांनी वाढ होणार आहे. हे नवीन दर 2 मे, 2022 पासून लागू होणार आहेत. एमसीएलआरमध्ये वाढ झाल्याने सर्व प्रकारची कर्जे जसे की, गृह कर्ज (Home loan), वाहन कर्ज (Car loan) आणि वैयक्तिक कर्जावर (Personal loan) पूर्वीपेक्षा अधिक व्याजदर द्यावा लागणार आहे. याचाच अर्थ ही सर्व प्रकारची कर्ज महागणार आहेत. याचा थेट परिणाम ईएमआय (EMI) वर होणार असून, कर्जदारांना पूर्वीच्या ईएमआयपेक्षा जास्त पैसे भरावे लागण्याची शक्यता आहे.
एमसीएलआर म्हणजे काय? What is MCLR?
MCLR म्हणजे निधी-आधारित कर्ज दराची सीमांत किंमत (Marginal Costs of Fund-Based Lending Rate). याचा अर्थ कर्ज देण्यापूर्वी बँकेकडून ग्राहकाला आकारण्यात येणारा किमान दर. MCLR आर्थिक गरजेनुसार RBI बदलू शकते. साधारणपणे, एमसीएलआर हा किमान व्याज दर आहे; जो ग्राहकांना कर्ज घेण्यासाठी भरावा लागतो.
कर्जे महागणार
रिटेल कर्जामधील गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे. येस बॅंकेने एमसीएलआरचा रेट 6.85 टक्के केला आहे. एक महिन्याचा एमसीएलआर दर 7.30 टक्के, 3 महिन्याचा एमसीएलआर दर 7.45 टक्के तर 6 महिन्याचा एमसीएलआर दर 8.25 टक्के आहे. येस बॅंकेने त्यांच्या वेबसाईटवर दिल्यानुसार, 1 वर्षासाठी एमसीएलआर दर 8.60 टक्के आहे.
येस बॅंकेचे 2 मे पासून नवीन व्याजदर लागू
- 24 तासांसाठी व्याजदर 6.85 टक्के
- 1 महिन्यासाठी व्याजदर 7.30 टक्के
- 3 महिन्यासाठी व्याजदर 7.45 टक्के
- 6 महिन्यांसाठी व्याजदर 8.25 टक्के
- 1 वर्षासाठी व्याजदर 8.60 टक्के
या बॅंकांनीही एमसीएलआर दर वाढवले
गेल्या महिन्याभरात स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State bank of India), बॅंक ऑफ बडोदा (Bank of Baroda), अक्सिस बॅंक (Axis bank) आणि कोटक महिंद्रा (Kotak Mahindra) बॅंकेने एमसीएलआर दरामध्ये वाढ केली. अशावेळी कमीतकमी व्याजदर आकारणाऱ्या बॅंकेत सध्याचे कर्ज हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडू शकता.
आरबीआयच्या रेपो दरात वाढ
रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी रेपो दरात 40 आधार बिंदूची वाढ केली. यापूर्वी आरबीआयचा रेपो रेट दर 4 टक्के होता, आता 4.40 टक्क्यांवर गेला आहे.
येस बॅंकेला चौथ्या तिमाहीत नफा
येस बॅंकेने 30 एप्रिल, 2022 रोजी 2021-22 च्या चौथ्या तिमाही अहवालात 367 कोटी रूपयांचा नफा कमावला आहे. गेल्यावर्षीच्या चौथ्या तिमाहीत बॅंकेला 3,788 कोटी रूपयांचा तोटा झाला होता. येस बॅंकेने 2021-22 त्या तिसऱ्या तिमाहीत 266 कोटी रूपयांचा नफा मिळवला होता. जानेवारी ते मार्च 2022 यादरम्यान बॅंकेच्या नफ्यात 38 टक्क्यांनी वाढ झाली होती.
रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे येत्या काही दिवसांत सर्व बॅंकांची गृह कर्जे, वाहन कर्जे आणि वैयक्तिक कर्जे महाग होणार आहेत. याबाबत संबंधित कर्जदारांनी आपापल्या बॅंकांशी संपर्क साधून बदललेल्या व्याजदराची किंवा वाढलेल्या ईएमआयची रक्कम जाणून घेऊन त्यानुसार नियोजन करावे.