Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fixed Vs Floating Interest Rate: गृहकर्जासाठी व्याजदराचा कोणता पर्याय चांगला, फिक्स की फ्लोटिंग?

Fixed Vs Floating Interest Rate: गृहकर्जासाठी व्याजदराचा कोणता पर्याय चांगला, फिक्स की फ्लोटिंग?

Fixed Vs Floating Interest Rate: गृहकर्ज घेताना व्याजदर आणि EMI सोबतच भविष्यातील खर्चांचा विचार करणे आवश्यक आहे. तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी गृहकर्जाच्या व्याजदराबाबतची माहिती जाणून घ्या. (Updated on 8 May 2023)

Fixed Vs Floating Interest Rate: फिक्स (स्थिर) आणि फ्लोटिंग (बदलते) व्याजदराचे आपापले फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे कर्ज परतफेडीच्या अटींचा बारकाईने अभ्यास करून योग्य पर्यायाची निवड करणे गरजेचे आहे. कर्ज हा प्रकार आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येकाला स्वत:ची गाडी, घर आणि इतर आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी घेण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. सध्याच्या काळात यात चुकीचे काहीच नाही. पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज काढावे लागते. कर्ज घेताना विशेषत: गृहकर्ज घेताना आपल्यासमोर व्याजाचे दोन पर्याय उपलब्ध असतात.

एक म्हणजे स्थिर व्याज आणि दुसरा बदलते व्याज दर (Fixed Interest Rate & Floating Interest Rate). कर्ज संपेपर्यंतच्या काळासाठी एकच व्याजदर आकारला जातो त्याला स्थिर व्याज दर म्हणतात. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण्याच्या आढाव्यानंतर वेळेवेळी बदलानुसार आकारल्या जाणाऱ्या व्याज दराला बदलते व्याज दर म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या कर्जाचे फायदे आणि तोटे आहेत. गृहकर्जाच्या स्थिर व्याजदर योजनेमध्ये कर्ज परतफेडीच्या कालावधीपर्यंत एकच व्याजदर राहतो. रेपोदरातील चढउतराचा कोणताही परिणाम यावर होत नाही. कर्जाचा कालावधी 1 वर्षाचा असो किंवा 20 वर्षांचा, व्याजदर कायम तोच राहतो.

स्थिर व्याजदराचे फायदे (Benefits of Fixed Interest Rate)

बाजारातील स्थिती कशीही असली तरी आपल्या कर्जावरील व्याजदरावर कोणताही परिणाम होत नाही. बाजारात व्याजदर वाढलेले असले तरी आपला व्याजदर निश्चित असल्याने कर्जदाराला जादा व्याजाची रक्कम मोजण्याची गरज भासत नाही. 

कर्ज घेताना ठरलेल्या नियमानुसार व्याजदर शेवटपर्यंत राहतो आणि त्याच नियमानुसार रिपेमेंट सुविधेचाही लाभ घेता येतो.

बाजारातील अस्थिरतेचा ज्या ग्राहकाला धोका वाटतो त्यांना निश्चित व्याजदर पद्धतीचे कर्ज सोयीचे ठरू शकते. ज्याचे उत्पन्न नियमित आहे आणि भविष्यात आर्थिक अडचणीची शक्यता नसणारे ग्राहक अशा प्रकारच्या व्याजदराचा पर्याय निवडू शकतात.

स्थिर व्याज दराचे तोटे (Disadvantage of Fixed Interest Rate)

स्थिर व्याज दराचा सर्वात मोठा तोटा म्हणजे बदलत्या व्याज दरापेक्षा स्थिर व्याजाचा दर 1 ते 2.5 टक्के अधिक असतो. तसेच बाजारातील व्याजदरात कपात होत असली त्याचा लाभ स्थिर व्याज घेतलेल्यांना घेता येत नाही. त्यामुळे अनावश्यक जादा व्याजाचा भुर्दंड पडतो.

काही बँका तीन वर्ष किंवा पाच वर्षांसाठी स्थिर व्याजदराची सोय देतात. या काळात आपल्याला इच्छा असूनही त्यात बदल करता येत नाही. उदाहरणच घ्यायचे झाल्यास कोविडच्या काळात बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात मोठ्या प्रमाणावर कपात केली. तसेच अलीकडील काळात बँकांमधील स्पर्धा वाढल्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीही गृहकर्जावरील व्याजदर कमीत कमी ठेवण्याकडे बॅंकांचा कल असतो. अशा सवलतींचा फायदा स्थिर व्याजदर घेतलेल्या ग्राहकांना घेता येत नाही.

गृहकर्ज घेताना बरेच जण बदलत्या व्याजदराने कर्ज घेतात. हा गृहकर्जातील लोकप्रिय प्रकार मानला जातो. बाजारातील बदलानुसार गृहकर्जाच्या व्याजदरात चढउतार होत असतो. त्याचा लाभ ग्राहकांना निश्चितच मिळतो. हे कर्ज बेस रेटशी निगडीत असल्याने दर तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला व्याजदरात बदल होत असतात. रिझर्व्ह बँकेच्या पतपधोरणात रेपो दरात झालेल्या बदलानुसार बँका कर्जाच्या व्याजदरात फेरबदल करत असतात.

बदलत्या व्याजदराचे फायदे (Benefits of Floating Interest Rate)

स्थिर व्याजदरापेक्षा बदलत्या व्याजाचा दर हा कमी असतो. हप्त्याचे प्रमाण कमी असते. बदलत्या व्याजदरामुळे भविष्यात कमी EMI होऊ शकतो.

जरी एखाद्या वेळी स्थिर व्याजदरापेक्षा कधी कधी बदलत्या व्याजदराचा रेट जास्त असला तरी तो कायम राहणारा नसतो. तो सारखा बदलत असल्याने कालांतराने स्थिर व्याजदरापेक्षा बदलत्या व्याजाचा दर कमी होऊ शकतो. त्यामुळे यातील नुकसान हे तात्कालिक असते.

सामान्यतः गृहकर्ज हे 20 ते 30 वर्षांसाठी घेतले जाते. या काळात काही कारणास्तव व्याजदरात खूप घसरण झाली तर कर्जफेडीची मुदत कमी होऊ शकते.

बदलत्या व्याजदरामध्ये ठराविक महिन्यानंतर हप्त्यात मुद्दलची कपात वाढत जाते आणि व्याजाची रक्कम कमी होत राहते. तसेच जेवढी रक्कम तेवढ्या रकमेवरच व्याजदर आकारण्याची सोय काही बँका करून देतात. तसेच रिपेमेंट केले तर कर्जातील मुद्दलमध्ये या रकमेचा समावेश होतो. त्यामुळे आपोआपच कर्जाचा कालावधी कमी होतो.

बदलत्या व्याजदराचे तोटे (Disadvantage of Floating Interest Rate)

महिन्याच्या ईएमआयमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेमुळे घराचे बजेट सांभाळताना कर्जदाराला कसरत करावी लागते. 

बदलत्या व्याजदरामुळे (Floating Interest Rate) नियमित ईएमआयमध्ये बदल होऊ शकतो.

बदलत्या व्याजदराने कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला दोनच पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे ईएमआय वाढवणे आणि दुसरा म्हणजे कर्जाचा कालावधी वाढवणे.

अशाप्रकारे स्थिर आणि बदलत्या व्याजदराचे फायदे आणि तोटे आहेत. मागील आर्थिक वर्षात आरबीआयने जवळपास रेपो दारत 2.50 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे बदलत्या व्याजदराने कर्ज घेतलेल्यांच्या ईएमआयमध्ये 2.50 टक्क्यांची वाढ झाली. तर काहींनी कर्जाचा कालावधी वाढवण्याचा पर्याय निवडला.