भारताचा घाऊक महागाई दर 21 महिन्यांच्या नीच्चांकी स्तरावर म्हणजे 5.85% वर पोहोचला आहे. वाणिज्य मंत्रालयाने नोव्हेंबर साठीचे आकडे नुकतेच जाहीर केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाऊक महागाई दर फक्त दोन महिन्यांत .470 अंशांनी खाली आला आहे. गेल्यावर्षी WPI आकडा ऑक्टोबर महिन्यात 8.39% तर नोव्हेंबरमध्ये 14.87% इतका होता.
दोनच दिवसांपूर्वी सांख्यिकी विभागाने देशाचा किरकोळ वस्तू आणि सेवांसाठी असलेला CPI महागाई दर जाहीर केला होता. आणि तो आकडाही 5.88% वर स्थिर होता. म्हणजे मागच्या दोन वर्षांत पहिल्यांदाच CPI आकडा 6%च्या खाली होता. रिझर्व्ह बँकेनं महागाई दरासाठी 2 ते 6 टक्क्यांच्या मध्ये राखण्याचं उद्दिष्टं ठेवलं आहे.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मागच्या दोन वर्षांत पहिल्यांदाच WPI चा आकडा हा CPI आकड्यापेक्षाही कमी आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2021मध्ये WPI 4.83% तर CPI 5.03% होतं. WPI मध्ये झालेली घसरण ही कमोडिटीज् किमतींमध्ये झालेल्या घसरणीमुळे शक्य झाली आहे. आणि यातला एक घटक अन्नधान्यांच्या किमती हा आहे.
अन्नधान्यांचे दर नोव्हेंबर महिन्यात आटोक्यात आले आहेत.त्यामुळे या क्षेत्राचा महागाई दर 2.17% इतका खाली आला, जो ऑक्टोबर महिन्यात 6.48%वर होता. तसंच उत्पादन क्षेत्राची कामगिरीही आधीच्या महिन्याच्या तुलनेत चांगली होती. या क्षेत्राचा महागाई दर 3.59% होता. उत्पादन क्षेत्रात महागाई दर खाली येणं महत्त्वाचं ठरलं. कारण, घाऊक महागाई दर ठरवताना गृहित धरल्या जाणाऱ्या बास्केटमध्ये औद्योगिक उत्पादनं मोठ्या प्रमाणावर आहेत.
इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातही महागाई दर खाली येतोय. आणि त्यामुळे WPI आकडाही कमी झाला आहे.
WPI महागाई कमी झाल्याचा फायदा काय? How the Economy Benefits From WPI Fall?
WPI आणि CPI हे दोन महागाई दर कसे वेगळे आहेत हे आपण बघितलंय. त्या बातमीची लिंक इथं आहे. थोडक्यात, CPIमध्ये आपण मार्केट बास्केट मधल्या वस्तू आणि सेवांचा किरकोळ बाजारातला दर पाहतो. तर WPI साठी घाऊक बाजारात विकल्या जाणाऱ्या काही वस्तू आणि सेवा गृहित धरल्या जातात. CPI प्रमाणे त्यांचीही एक मार्केट बास्केट बनवली जाते. आणि त्यातून WPI म्हणजे घाऊक बाजारात असलेला महागाई दर काढला जातो.
देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत WPIचं महत्त्वं जास्त आहे. कारण, WPI मार्केट बास्केटमध्ये अन्नधान्यांच्या घाऊक किमती आणि औद्योगिक उत्पादनांच्या किमती गृहित धरल्या जातात. ही दोन्ही क्षेत्रं देशाच्या आर्थिक प्रगतीत मोठी भूमिका बजावत असल्यामुळे WPI हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा मापदंड आहे.
WPI चा उपयोग काय? How is WPI Used?
देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँकेचं CPI बरोबरच WPI वरही लक्ष असतं. आणि रेपो दर ठरवताना बँक या आकड्याचा विचार करत असते. 2023मध्ये फेब्रुवारीच्या 6 ते 8 तारखेदरम्यान रिझर्व्ह बँकेचं तिमाही पतधोरण ठरवण्यासाठी बैठक होणार आहे. WPIमध्ये झालेली घट ही सकारात्मक आहे. त्यावरून रेपो रेट आणखी वाढवण्याची गरज आहे की, या दरातली वाढ मर्यादित ठेवायची याचा निर्णय घेतला जाईल.