• 27 Mar, 2023 06:19

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electricity Bill वाढतंय? AC च्या स्मार्ट वापरासाठी 5 टीप्स

Electricity Bill वाढतंय? AC च्या स्मार्ट वापरासाठी 5 टीप्स

Electricity Bill Hacks : राज्यात आता उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या तापमानात एसीचा वापरही वाढणार आणि त्याचा परिणाम वीज बिलावर होणार हे नक्की. पण, खरंतर एसी वापरूनही तुमचं वीज बिल तुम्ही आटोक्यात ठेवू शकता. त्यासाठीच्या काही स्मार्ट टीप्स बघूया…

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतो आहे.वाढती उष्णता आणि तापमान यांमुळे कुलिंग प्रॉडक्ट्सच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. एअर कंडिशनरच्या उत्पादक कंपन्यांनी उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे. तसेच वाढत्या मागणीसह एयर कंडिशनरचे भाव देखील वाढणार आहेत. 

एसीचा वाढता वापर तुमच्या लाईट बिलात देखील वाढ करू शकतो हे देखील लक्षात घ्यायला हवे. परंतु एसीचा वापर करताना काही सोप्या ट्रिक्स जर वापरल्या तर तुम्ही विजेची बचत करू शकता. तेव्हा उन्हापासून आणि लाईटच्या वाढत्या बिलापासून दिलासा मिळवायचा असेल तर हा लेख जरूर वाचा आणि दिलेल्या टिप्स फॉलो करा.

थर्मोस्टॅटचा वापर : थर्मोस्टॅट हे एसीमधील एक असे फिचर आहे जे परस्पर एसीचे तापमान सेट करते. यामुळे गरज असेल तरच एसीचे तापमान कमी किंवा जास्त होते. त्यामुळे वीजेची सुद्धा बचत होते.

प्रोग्राम करण्यायोग्य थर्मोस्टॅट तुम्ही घरात नसताना किंवा तुम्ही झोपलेले असताना देखील तुमच्या घराचे तापमान स्वयंचलितपणे सेट केले जाऊ शकते. याचा वापर केल्यास तुम्हाला तुमच्या वार्षिक कूलिंग खर्चावर 10% पर्यंत बचत करता येऊ शकते.

एअर कंडिशनरचे तापमान : खोली बाहेरील तापमान आणि खोलीच्या आतील तापमान यांच्यातील फरक जितका कमी असेल तितका तुमचा एअर कंडिशनर कमी ऊर्जा वापरेल हे गणित लक्षात घ्या. म्हणून, तापमान 24-26 अंश सेल्सिअसच्या आसपास मध्यम पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हांला आल्हाददायक तापमान तर मिळेलच पण सोबत विजेची बचतही होईल.

एअर फिल्टर्सची नियमित स्वच्छता : कचरा, धूळ यांमुळे एअर फिल्टर्स हवेचा प्रवाह कमी करू शकतात आणि तुमच्या एअर कंडिशनरचा ऊर्जेचा वापर वाढवू शकतात. तेव्हा दर 1-2 महिन्यांनी एसीचे एयर फिल्टर साफ करा किंवा बदला.

खोलीचे पडदे : ज्या खोलीत एसी इंस्टॉल करणार आहात त्या खोलीचे पडदे गडद रंगाचे हवेत. गडद रंगाचे पडदे खोलीत येणारा सूर्यप्रकाश प्रतिबंधित करेल आणि तुमच्या घरात प्रवेश करणारी उष्णता कमी करेल, ज्यामुळे तुमच्या एअर कंडिशनरवरील भार कमी होईल. अर्थात यामुळे विजेची आणि पर्यायाने पैशाची बचत होणार आहे.

एअर कंडिशनर सोबत पंखे वापरा : AC सुरू असताना तुमचा सिलिंग फॅन सुरू ठेवा. सिलिंग फॅन तुमच्या घरात थंड हवा खेळती राहण्यासाठी मदत करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या एअर कंडिशनरचे तापमान कमी करावे लागणार नाही. कमी एनर्जी वापरून अधिक कुलिंग मिळवण्याची ही अगदी सोपी आयडिया आहे. सोबतच एसी सुरू करण्यापूर्वी खोलीची दारे- खिडक्या उघडून खोलीचा पंखा जर लावला तर खोलीतील गरम हवा निघून जाईल आणि कमी ऊर्जेत लवकरात लवकर खोलीत थंडावा निर्माण होईल.

वापर नसेल तर एअर कंडिशनर बंद करा: हे तर अगदी सोपे काम आहे. जेव्हा तुम्ही खोलीतून बाहेर पडत असाल तेव्हा एसी बंद करायला विसरू नका. यामुळे ऊर्जेची बचत होईल आणि तुमचे वीज बिल कमी होईल.

एअर कंडिशनरची देखभाल: एयर कंडिशनरची नियमित देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे. जसे की कॉइल आणि फिन्स साफ करणे, फॅन मोटर्सला वंगण घालणे आणि एसीची रेफ्रिजरंट पातळी (Refrigerant Level) तपासणे . या सगळ्या गोष्टी नियमित केल्यास तुमच्या एअर कंडिशनरची कार्यक्षमता सुधारू शकते आणि तुमचे वीज बिल कमी होऊ शकते.

एयर कंडीशनर खरेदी करताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. कारण एसी खरेदी करताना तुम्ही मोठी किंमत दुकानदाराला देणार आहात. कुठलीही इलेक्ट्रोनिक वस्तू खरेदी करताना तिचा अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे. अभ्यास न करता एसी खरेदी केला तर नको त्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

save-light-bill-by-using-air-conditioner.jpg

एसी खरेदी करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा?

एअर कंडिशनर खरेदी करताना काही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. आपण नेहमी नेहमी AC खरेदी करत नाही. एकदाच खरेदी केली जाणारी आणि महागाईची ही इलेक्ट्रोनिक वस्तू खरेदी करताना कुठल्या गोष्टींचा विचार केला जावा हे जाणून घेऊयात.

खोलीचा आकार: ज्या खोलीत एअर कंडिशनर बसवण्याचा विचार करत आहात त्या खोलीचा आकार विचारात घ्यावा. आवश्यकतेनुसार किती टनचा एअर कंडिशनर घ्यायचा हे खोलीच्या आकारावर अवलंबून आहे हे लक्षात घ्या.

ऊर्जा कार्यक्षमता: एनर्जी स्टार प्रमाणित असलेले एअर कंडिशनरच खरेदी करा.जितके जास्त एनर्जी स्टार तितकी जास्त उर्जेची बचत हे लक्षात घ्या. असे AC अधिक ऊर्जा कार्यक्षम असतात आणि दीर्घकाळात तुमच्या वीज बिलावरील पैसे वाचवू शकतात.

एअर कंडिशनरचे प्रकार: विंडो युनिट्स (Window Units), स्प्लिट-सिस्टम्स (Split Systems), पोर्टेबल एअर कंडिशनर्स (Portable Air Conditioners) आणि सेंट्रल एअर कंडिशनर्ससह (Central Air Conditioner) असे विविध प्रकारचे एअर कंडिशनर्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या गरजेनुसार आणि वापरानुसार  योग्य प्रकारचा AC  निवडा.

AC चा आवाज: काही एअर कंडिशनर खूप आवाज करणारे असू शकतात, जे तुम्हांला त्रासदायक ठरू शकतात. विंडो युनिट्स (Window Units) एसी हे इतर एसीपेक्षा किमतीला कमी असले तरी जास्त आवाज करणारे असतात.

इंस्टॉलेशन: तुम्ही विचार करत असलेल्या एअर कंडिशनरच्या इंस्टॉलेशन आवश्यकतांचा विचार करा. काही एअर कंडिशनर्सला तज्ञांच्या मदतीने इंस्टॉलेशन करणे आवश्यक असते, तर काही एअर कंडिशनर घरच्या घरी  इंस्टॉल केली जाऊ शकतात.

अतिरिक्त वैशिष्ट्ये: काही एअर कंडिशनर्समध्ये टायमर, रिमोट कंट्रोल आणि एअर प्युरिफायर यासारख्या अतिरिक्त वैशिष्ट्ये असतात. ही वैशिष्ट्ये तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत का याचा विचार करा.जितके जास्त फीचर्स हवे असतील तितके जास्त पैसे मोजावे लागतील हे विसरू नका.

ब्रँड आणि वॉरंटी: चांगल्या वॉरंटीसह नावाजलेल्या कंपनीचेच एसी निवडा. यात काहीही अडचणी असल्यास त्याचा निपटारा वेळेत केला जातो.