वर्ल्ड बँकेने भारतातील सरकारी शाळांमधून दिल्या तांत्रिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी 255.5 मिलिअन डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. देशातील निवडक राज्यातील 275 सरकारी तांत्रिक शाळांचा या प्रोजेक्टमध्ये समावेश केला जाणार असून, याद्वारे सुमारे 3.50 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना दरवर्षी लाभ मिळणार आहे.
तांत्रिक शिक्षणातील विविध शाखांमधील मूलभूत शिक्षण आणि संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी या प्रोजेक्टचा उपयोग केला जाणार आहे. तसेच तांत्रिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या प्रोजेक्टचा वापर केला जाणार आहे. तसेच या प्रोजेक्टद्वारे भारतातील विद्यार्थ्यांना कम्युनिकेशनमधील नवीन तंत्रज्ञान आणि हवामानातील बदलांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. यातून चांगल्या इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
चांगले आणि दर्जेदार शिक्षण घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 2011-12 29 मिलिअन विद्यार्थी नोंदवले गेले होते. ते 2019-20 मध्ये 39 मिलिअनपर्यंत गेले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 द्वारे शिक्षण धोरणामध्ये बरेच बदल केले आहेत. या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. तसेच यामुळे नोकरी आणि व्यावसायाच्या संधी देखील वाढणार आहेत.
या प्रोजेक्टच्या माध्यमातून मुलींचा तांत्रिक शिक्षणातील सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच पालकांना तांत्रिक शिक्षणाबद्दल उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विविध संधी उलगडून सांगण्यासाठी या प्रोजेक्टचा वापर केला जाणार आहे.