• 24 Sep, 2023 06:32

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Neeraj Chopra Wins Gold: वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये नीरज चोप्राला गोल्ड मेडल! बक्षीसाची रक्कम जाणून घ्या

World Athletics Championships

Image Source : www.thehindu.com

Neeraj Chopra wins gold: ऑलंपिक आणि वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये पदक मिळणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी नेमबाज अभिनव बिंद्रा याने केली होती.

हंगेरीमधील बुडापेस्ट शहरात सुरु असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा याने 88.17 मीटर लांब भाला फेक करत गोल्ड मेडलवर नाव कोरले. वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण कामगिरी करुन तिरंगा फडकणाऱ्या नीरज चोप्रावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Neeraj Chopra Win Gold in World Athletics Championships 2023)

ऑलंपिक आणि वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये पदक मिळणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी नेमबाज अभिनव बिंद्रा याने केली होती. गोल्ड मेडल मिळवणाऱ्या नीरज चोप्राला 70000 डॉलर्सचे (भारतीय चलनात 57 लाख 40000 रुपये) बक्षीस मिळणार आहे. 

भालाफेकीच्या अंतिम स्पर्धेत नीरज चोप्राबरोबर आणखी दोन अ‍ॅथलिट्सने अंतिम आठमध्ये धडक दिली. चोप्रा याला गोल्ड मेडल मिळाले. पाचव्या स्थानावर किशोर जेना 84.77 मीटर आणि डी.पी मानू या अ‍ॅथलिट्सने 84.14 मीटर भालाफेक करत जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या आठ खेळाडूंमध्ये तिघा भारतीयांचा समावेश असल्याची ही पहिलीच वेळ आहे.

भालाफेकीच्या अंतिम सामन्याची सुरवात नीरजसाठी निराशाजनक झाली होती. पहिल्यावेळी त्याचा फाउल झाला होता. मात्र त्यातून जबरदस्त पुनरागमन करत चोप्रा याने स्पर्धेतील सर्वोत्तम भालाफेकीचे दर्शन घडवले. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा अर्शद नदीम याने 87.82 मीटर भालाफेक करत सिव्हर मेडल मिळवले. झेक रिपब्लिकचा जेकब वाल्डेज याला ब्रॉंझ मेडल मिळाले. त्याने 86.67 मीटर भाला फेक केला.

पुरुष रिले स्पर्धेत भारतीय संघाची जबरदस्त कामगिरी

वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पुरुषांच्या 4*400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली. रिले स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने 2.59.92 सेकंदाची वेळ नोंदवून पाचव्या स्थानावर झेप घेतली. या स्पर्धेत अमेरिकेच्या संघाने गोल्ड मेडल पटकावले. फ्रान्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आणि ब्रिटनचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. भारतीय संघात मुहम्मद अनास, अमोज जेकब, मुहम्मद अजमल आणि वरियाथोडी रमेश या धावपटूंचा समावेश होता.

World Athletics Championships मधील बक्षीसे

  • हंगेरीतील बुडापेस्ट शहरात होत असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत एकूण बक्षिसाची रक्कम 8.5 मिलियन डॉलर्स इतकी आहे.
  • Runner's World या मासिकानुसार या स्पर्धेत कोणत्याही खेळामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यास त्यासाठी 100000 डॉलर्सची स्वतंत्र तरतूद आहे.
  • प्रत्येक क्रीडा प्रकारात पहिल्या आठ स्पर्धकांना कॅश प्राईज दिले जाते.
  • यात गोल्ड मेडल जिंकणाऱ्या अव्वल खेळाडूला 70000 अमेरिकन डॉलर्स दिले जातात. 
  • सिल्व्हर मेडलिस्टला 35000 डॉलर्स आणि ब्रॉंझ मेडलिस्ट खेळाडूला 22000 डॉलर्स दिले जातात.
  • स्पर्धेतील सर्वात शेवटच्या स्थानावर म्हणजेच आठव्या स्थानावरील खेळाडूला 5000 डॉलर्सचे बक्षीस दिले जाते.
  • रिले क्रीडा प्रकारात प्रथम येणाऱ्या संघाला 80000 डॉलर्स दिले जातात. 
  • दुसऱ्या संघाला 40000 डॉलर्स आणि तिसऱ्या स्थानावरील संघाला 20000 डॉलर्सचे बक्षीस दिले जातात.