विप्रो या नामांकित कंपनीत सर्वांच्या भरवश्याचे सीएफओ जतीन दलाल यांनी 21 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दलाल हे विप्रोमधले सर्वात विश्वासू आणि सर्वांच्या आवडीचं व्यक्तीमत्व होतं.अगदी विप्रोचे प्रमोटर अजीम प्रेमजी यांच्या अत्यंत विश्वासातले म्हणून दलाल यांच्याकडे पाहिलं जातं. जेव्हा इतक्या मोठया पदावरची व्यक्ती असा तडकाफडकी निर्णय घेते तेव्हा बाजारात चर्चांना उधाण येण ही काही नवी गोष्ट नाही. दलाल यांच्या जागी आज म्हणजेच 22 सप्टेंबरपासून अपर्णा अय्यर जबाबदारी सांभाळणार आहेत.
दलालांच्या राजीनाम्यात काय म्हटलं आहे?
जतीन दलाल यांनी आपला राजीनामा विप्रोचे साईओ Thierry Delaporte यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.आपल्या राजीनाम्यात त्यांनी आपल्याला काही प्रोफेशनल गोल्स साध्य करायचे असल्याचं म्हटलं आहे. महत्वाचं म्हणजे हेच जतीन दलाल गेल्या काही महिन्यांपासून विप्रोच्या जूनच्या तिमाहीबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना आश्वासक उत्तरं देत होते.
बाजारात चर्चांना उधाण
गेल्या तिमाहीत विप्रोची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. विप्रो ही भारतातली चौथी सर्वात मोठी आयटी कंपनी मानली जाते. मात्र गेल्या तिमाहीपासून कंपनीचा ग्रोथ गायडंस कमकुवत पाहायला मिळत आहे. एकीकडे ही चिंता कंपनीला सतावत असताना कंपनीचे कर्मचारीही राजीनामा देत होते. अशात जतीन दलाल यांच्यासारख्या अभ्यासू आणि मेहनती माणसानेही विप्रोची साथ सोडणं हे कंपनीत सारंकाही आलबेल नाही याची जाणीव करून देते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कंपनीला आपले कुशल कर्मचारी सांभाळता आले पाहिजेत. अशा प्रकारे एकापाठोपाठ एक कर्मचाऱ्यांनी कंपनीला रामराम ठोकणं चांगलं नाहीये.दलाल यांचा राजीनामा कंपनीसाठी मोठा धक्का असल्याचं मत जाणाकार मंडळी नोंदवत आहेत.
2022 च्या शेवटच्या तिमाहीपासून वार्षिक ग्रोथ रेटमध्ये सुरू झाली घसरण
2022 च्या शेवटच्या तिमाहीपासून विप्रोच्या ग्रोथ रेटमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत विप्रोची कामगिरी तितकीशी आश्वासक पाहायला मिळत नाहीय.चालू महिन्याच्या पहिल्या तिमाहीत विप्रोचा एकत्रित निव्वळ नफा 2,870 कोटी झाला आहे. विश्लेषकांच्या मते हा नफा 2,976 कोटी रुपयांच्या घरात असायला हवा होता.