Liquid Fund Investment : लिक्विड फंड हे एक प्रकराचे म्युच्युअल फंडच असतात. मात्र, हे फंड इक्विटी शेअर मार्केटमध्ये पैसे न गुंतवता डेट मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. म्हणजेच सरकारी रोखे, डिबेंचर्स, प्रायव्हेट बाँड्स यासारख्या पर्यायांमध्ये फंड मॅनेजर पैसे गुंतवतो. अनेक आघाडीच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांचे लिक्विड म्युच्युअल फंड बाजारात उपलब्ध आहेत. या फंडला लिक्विड फंड असे का म्हणतात? असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल? तर याचं कारण, या फंडातली गुंतवणूक नावाप्रमाणे लवचिक किंवा कधीही मोडता येण्यासारखी असते. तुम्हाला जास्तीत जास्त अर्ध्या दिवसांत किंवा संध्याकाळी तुम्ही गुंतवणूक मोडलीत तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचे गुंतवणुकीचे पैसे परत मिळतात.
बँक खात्यात ठेवलेल्या पैशाच्या खालोखाल सगळ्यात जास्त रोखता असलेली ही गुंतवणूक आहे. शिवाय म्युच्युअल फंडातली गुंतवणूक असल्यामुळे बँक खात्यापेक्षा जास्त व्याज त्यावर मिळत राहतं. त्यामुळे बँक खात्यात पैसे पडून राहण्यापेक्षा ते लिक्विड फंडात ठेवण्याचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञ देत असतात. लिक्विड फंडातल्या गुंतवणुकीवर बँक खात्यापेक्षा सरासरी जास्त व्याज मिळतं. शिवाय पाहिजे तेव्हा पैसे काढून घेता येतात. त्यामुळे अडचणीच्या वेळी लागणाऱ्या पैशासाठी ही योग्य गुंतवणूक मानली जाते. तुमचा इमर्जन्सी फंड म्हणून तुम्ही लिक्विड फंडाकडे बघू शकता.
कोणतीही गुंतवणूक करताना कालावधी हा महत्त्वाचा घटक आहे. भांडवली बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास नफा मिळण्याची जास्त शक्यता असते. जसे इक्विटी फंड, हायब्रीड फंड, स्मॉल लार्ज कॅप फंड यामध्ये जर गुंतवणूकदार दीर्घ काळासाठी पैसे गुंतवत असाल तर त्याला जास्त फायदा मिळेल. मात्र, जर आणीबाणीच्या वेळी तुम्हाला लगेच पैशाची गरज असेल तर अनेक म्युच्युअल फंड तीन दिवसांचा अवधी सेटलमेंटसाठी घेतात. ELSS म्युच्युअल फंडांसाठी तर 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. याउलट लिक्विड फंडातला परतावा मर्यादित असला तरी तुमचे पैसे अडकून पडत नाहीत. ते त्वरित तुम्हाला मिळतात. हा त्याचा मुख्य फायदा आहे.
लिक्विड फंड आणीबाणी हाताळण्यासाठी
वरती म्हटल्याप्रमाणे लिक्विड फंड हे 91 दिवसांपेक्षा म्हणजेच तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या डेट पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. (Benefits of Investing in Liquid Mutual Funds) तुमच्या स्वत: वर किंवा कुटुंबावर एखादी आणीबाणी आली. त्याकाळात तुम्हाला पैशांची गरज पडली तर काय कराल? दीर्घकाळासाठी म्हणजेच इक्विटी, मुदत ठेव, शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर तत्काळ पैसे काढता येत नाही. कारण, बाजारात चढउतार सुरू असतात. बाजार खाली आला असेल तर गुंतवणुकीचे मुल्य कमी झालेले असेल. अशा काळात पैसे काढणे तोट्याचे ठरेल. त्यापेक्षा तुम्ही लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करून तीन महिन्यांच्या आत पैसे हातात मिळवू शकता.
कमी जोखीम आणि तरलता हे दोन महत्त्वाचे फायदे लिक्विड फंड योजनांमधून मिळतात. तसेच या गुंतवणुकीला लॉक इन पिरियडही नसतो. एमर्जन्सी फंडासाठीचा निधी अनेक जण लिक्विड फंडात गुंतवतात. कारण, बचत खात्यावर खूप कमी व्याज मिळते. त्यापेक्षा तीन महिन्यांच्या कालावधीसाठी लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक केली तर चांगला परतावाही मिळू शकतो. आणि पैसे तत्काळ उपलब्धही होऊ शकतात.
अल्पकाळातील ध्येय साध्य करण्यासाठी मदत
समजा, तुम्हाला नवी गाडी खरेदी करायची आहे. तुमच्याकडे त्यासाठी पैसेही आहेत. मात्र, तुम्ही जी गाडी घेण्याचा विचार करत आहात त्यास तीन महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. अशा परिस्थितीत तुम्ही बचत खात्यात पैसे ठेवण्यापेक्षा लिक्विड फंडमध्ये गुंतवू शकता. त्यातून तुम्हाला परतावाही मिळेल आणि तीन महिन्यांनी पैसे काढून तुम्ही गाडीही विकत घेऊ शकतात. तसेच मुलांचे शैक्षणिक शुल्क, खरेदी, पर्यटन यासाठी तुम्हाला अल्प कालावधीमध्ये पैशांची गरज पडणार आहे, असे माहिती असेल तेव्हा लिक्विड फंडात पैसे गुंतवणे योग्य ठरते.
समजा, तीन महिन्यानंतरही तुम्ही पैसे काढले नाही तर फंड मॅनेजर पुन्हा तीन महिन्यांच्या एखाद्या योजनेत तुमचे पैसे गुंतवेल. त्यामुळे दीर्घकाळ पैसे अडकून राहण्याचा प्रश्नच येत नाही.
लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक कशी कराल? (How to invest in Liquid Fund)
लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक डायरेक्ट (थेट) आणि दुसरा इनडायरेक्ट (अप्रत्यक्ष) मोड. जर तुम्ही अॅसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा फंड हाऊसकडून थेट ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने गुंतवणूक करू शकता. यामध्ये शुल्क कमी लागते. दुसरा पर्याय आहे इनडायरेक्ट मोड. तुम्ही ब्रोकर, अॅग्रिगेटर किंवा थर्ड पार्टीकडून लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. आघाडीच्या फंड मॅनेजमेंट कंपन्यांचे अनेक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असतील. सखोल चौकशी केल्यानंतरच लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करा.
(डिसक्लेमर: शेअर बाजार/म्युच्युअल फंड, SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)