जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (World health organization) अधिकारी आणि आरोग्य सेवा अधिकाऱ्यांना याविषयीचा अलर्ट जारी करण्यात आलाय. तर यावरून औषध निर्माता कंपनीनंदेखील प्रतिक्रिया दिलीय. पंजाब आणि हरयाणामधल्या फार्मा कंपन्यांना डब्ल्यूएचओनं निर्मिती आणि विक्री याबद्दलचा इशारा दिलाय. तसंच हे औषध दूषित असल्याचंही म्हटलंय. तर हे औषध घेणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याला कोणता धोका निर्माण होऊ शकतो, याविषयीचं भाष्य संयुक्त राष्ट्रानं (United Nations) केलंय. या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकारी त्याचप्रमाणं आरोग्य सेवेशी संबंधित व्यावसायिकांनी अशाप्रकारचं निकृष्ट औषध न वापरण्याचं आवाहन केलंय.
Table of contents [Show]
दूषित पदार्थांची मात्रा आढळली
सर्वात पहिल्यांदा डब्ल्यूएचओ संघटनेकडे याविषयीचा रिपोर्ट 6 एप्रिल 2023ला करण्यात आला. आयलंड आणि मायक्रोनेशिया इथल्या औषधांच्या संदर्भानं हा रिपोर्ट करण्यात आला. ग्वायफेनेसिन हे कफ पाडणारं औषध आहे. छातीतला रक्तपुरवठा सुरळीत करणं आणि खोकल्याची लक्षणं दूर करणं हे काम या औषधामार्फत केलं जातं, अशी माहिती डब्ल्यूएचओनं दिली. यात पुढे म्हटलंय, की मार्शल आयलंडमधील ग्वाफेनेसिन सिरप टीजी सिरपचे नमुने ऑस्ट्रेलियाच्या थेरप्युटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशनच्या (टीजीए) गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले. त्यांनी या औषधाची चाचणी आणि परीक्षण केलं. तेव्हा या उत्पादनात त्यांना डायथिलीन ग्लायकोन आणि इथिलीन ग्लायकोन अशा दूषित पदार्थांची मात्रा गरजेपेक्षा अधिक आढळून आली.
डब्ल्यूएचओला दिली नाही हमी
संबंधित औषध निर्माता कंपनी क्यूपी फार्माकेम लिमिटेड (QP PHARMACHEM LTD) ही पंजाबस्थित कंपनी आहे. तर ट्रिलियम फार्मा ही हरयाणामधली औषध निर्माता कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी आजपर्यंत संबंधित उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल तसंच गुणवत्तेबद्दल डब्ल्यूएचओला कोणतीही हमी दिलेली नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. त्यामुळे परीक्षणानंतरच हा अलर्ट जारी करण्यात आलाय. या उत्पादनास पश्चिम पॅसेफिक प्रदेश त्याचप्रमाणं इतर देशांमध्ये वितरित केलं जाऊ शकतं. तसंच अनौपचारिकरित्या इतर देश आणि प्रदेशांमध्ये वितरीत करता येतं, असंही या अलर्टमध्ये म्हटलंय.
कंपनीचं काय म्हणणं?
डब्ल्यूएचओनं या सिरपवर अलर्ट जारी केल्यानंतर आता कंपनीनंही आपली प्रतिक्रिया दिलीय. संबंधित औषध डुप्लिकेट असावं अशी शंका औषध उत्पादक क्यूपी फार्मा केम लिमिटेडच्या एमडींनी वर्तवलीय. कंबोडियाला पाठवलेलं उत्पादन (कफ सिरप) कोणीतरी डुप्लिकेट बनवलं आणि नंतर भारत सरकारची बदनामी करण्यासाठी मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियात विकलं, अशी पंजाबच्या अन्न आणि औषध प्रशासनाला शंका आहे. एफडीए विभागानं कंबोडियाला तपासणीसाठी पाठवलेल्या कफ सिरपचे नमुने घेतलेत. एकूण 18,336 खोकल्याच्या सिरपच्या बाटल्या पाठवण्यात आल्या, असं एम. डी. सुधीर पाठक यांनी एएनआयला सांगितलंय.
World Health Organisation has issued 'WHO Medical Product Alert' after "Substandard (contaminated)" Guaifenesin Syrup TG Syrup was found in the Marshall Islands and Micronesia.
— ANI (@ANI) April 26, 2023
The manufacturer of the affected product is QP Pharma Chem Limited in Punjab, India. The marketer of… pic.twitter.com/7IdSpmSo9J
दूषित घटकांविषयी काय म्हटलं डब्ल्यूएचओनं?
डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचं सेवन मानवी आरोग्यासाठी घातक आहे. ही रसायनं मानवासाठी विषारी आणि प्राणघातक ठरू शकतात. हे एक असुरक्षित उत्पादन आहे. मुलांना अशाप्रकारच्या औषधामुळे गंभीर दुखापत किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. इतर परिणामांमध्ये ओटीपोटात दुखणं, उलट्या होणं, अतिसार, लघवी करताना त्रास होणं, तीव्र मूत्रपिंडाची दुखापत, डोकेदुखी, मानसिक स्थितीच बदल अशाप्रकारच्या काही लक्षणांचा समावेश औषधाचं सेवन करणाऱ्यांमध्ये असू शकतो. रुग्णाचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता वर्तवली आहे.