Scholarship for Minority: महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप/शिष्यवृ्त्ती योजना राबवल्या जातात. यामध्ये अल्पसंख्याक विभागाच्यावतीनेही केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना चालवल्या जातात. अल्पसंख्याक विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ अल्पसंख्याकांना घेता येतो. महाराष्ट्रात धर्म आणि भाषेच्या आधारावर अल्पसंख्याकांसाठी काही योजना राबवल्या जातात.
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अधिनियमानुसार केंद्र सरकारने 6 धर्मांना अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित केले आहे. यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, पारशी आणि जैन या धर्मियांचा समावेश आहे. राज्य सरकार केंद्र आणि राज्य पुरस्कृत अशा एकूण 5 शिष्यवृत्ती योजना राबवत आहे. केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती, मेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप योजना राबवल्या जातात. तर राज्य पुरस्कृत शिष्यवृत्तींमध्ये उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य सरकारची अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे.
अल्पसंख्याक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती आणि अर्ज केंद्राच्या अल्पसंख्याक विभागाच्या संकेतस्थळावरून करता येऊ शकतो. त्याचबरोबर राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रातर्फे राबवल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपसाठी https://scholarships.gov.in/ यावरून अर्ज करता येऊ शकतो.
Table of contents [Show]
प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती
प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ही केंद्राच्या अल्पसंख्याक विभागातर्फे राबवली जाते. या योजनेंतर्गत सरकारी आणि खासगी शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच त्या विद्यार्थ्याने मागील वर्षात किमान 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेले पाहिजेत.
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी सदर विद्यार्थ्याच्या पालकाचे वय 2 लाखापेक्षा कमी आणि त्याने मागील वर्षी 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणे गरजेचे आहे.
मेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती
मेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती योजना ही टेक्निकल आणि कर्मिशिअल अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाते. यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख आणि विद्याार्थ्याने 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणे गरजेचे आहे.
मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप
केंद्राच्या अल्पसंख्याक विभागातर्फे मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत बौद्ध, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, पारशी आणि शिख धर्मियांमधील एम.फिल आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षांसाठी फेलोशिप दिली जाते.
महाडीबीटी स्कॉलरशीप
राज्य सरकारतर्फे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ही उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणासाठी दिली जाते. या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांना प्रतिवर्षाला 25,000 रुपयांची रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते. यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचबरोबर त्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच त्याला या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला इतर शिष्यवृत्तींचा लाभ घेता येणार नाही. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी स्कॉलरशीप वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येईल. शिष्यवृत्तीची रक्कम संबधित विद्यार्थ्याच्या बॅंक खात्यात ECS किंवा NEFT द्वारे जमा होते.